आर्थिक गैरव्यहारांप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी छगन भुजबळ यांच्या २० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. आता भुजबळांच्या जप्त केलेल्या संपत्तीचा आकडा १७८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली. ईडीने मंगळवारी २० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून ईडीमधील अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता. भुजबळांच्या जामीन अर्जावर या आठवड्यात न्यायालय निर्णय देणार आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) कलम ४५ मुळे राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या स्वातंत्र्यावर गदा येते असे भुजबळ यांच्या वकिलांनी सांगितले होते. छगन भुजबळांच्या वतीने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालांचा दाखलाही देण्यात आला होता. त्यामुळे भुजबळ यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र दुसरीकडे ही कारवाई झाल्याने भुजबळ कुटुंबीयांना हादरा बसला आहे.