छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

 नागपूर : जलयुक्त शिवार ही योजना ग्रामीण भागात राबवण्यात येत असल्याची कल्पना होती, परंतु आता तर ती विधिमंडळाच्या परिसरात राबवण्यात येत आहे. यासाठी अध्यक्षांची परवानगी घेण्यात आली होती काय, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला.

महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळ्याच्या आरोपाखाली भुजबळ सुमारे दोन वर्षे दोन महिने कारागृहात होते. त्यांची जामिनावर सुटका झाली असून तब्बल तीन वर्षांनंतर विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले आहेत. भुजबळ यांचे विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांची चारचाकी वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भुजबळ यांनी शुक्रवारी पावसामुळे विधिमंडळाचे कामकाज वाया गेल्याचा मुद्दा उपस्थित केला. विधान भवनाच्या वीजघरात पावसाचे पाणी साचल्याने दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब करावे लागले होते. या मुद्यांवरून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

भिडेंबाबत बहुजनांनी पुनर्विचार करावा

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ आहे, असे वक्तव्य भिडे गुरुजी यांनी केले. यासंदर्भात भुजबळ म्हणाले, याचा धिक्कार करायला हवा. सर्व संतांनी उच्च-नीच भेदभाव नसावा, असा संदेश दिला. मनुस्मृती तर ९७ टक्के लोकांना शूद्र ठरवते आणि उर्वरित तीन टक्के लोकांना श्रेष्ठत्व बहाल करते. म्हणून महात्मा फुले यांनी मनुस्मृती जाळून टाकावी, असे सांगितले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावर प्रत्यक्ष कृती केली. त्याच  मनुस्मृती पुन्हा उदोउदो होत असेल तर ते चुकीचे आहे. असे वक्तव्य करणाऱ्या भिडे गुरुजींसोबत असलेल्या बहुजन बांधवांनी आपण कोणाची साथ देत आहोत, याचा पुनर्विचार करावा, असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले.

घोटाळा नाही, मग व्यवहार रद्द का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील सिडकोच्या जमीन व्यवहारात घोटाळा झाला नाही, असे सांगतात आणि दुसरीकडे जमिनीचे व्यवहार रद्द करण्याचे जाहीर करतात. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जमीन व्यवहारात कुठेतरी पाणी मुरतय, हेच यातून स्पष्ट होत आहे, असेही भुजबळ म्हणाले.