भाजपातील ७० टक्के आमदार राष्ट्रवादीचेच आहेत, शरद पवार याबद्दल निर्णय घेतील असं आता छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. आजी माजी आमदार हे राष्ट्रवादीत येण्यासाठी शरद पवारांकडे इच्छा व्यक्त करत असतील मात्र कुणाला पक्षात घ्यायचं हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांनी भाजपाचे १० पेक्षा जास्त आमदार आमच्या संपर्कात आहेत असं म्हटल्यानंतर आता छगन भुजबळ यांनी हे नवं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे भाजपाचे काही नेते, आमदार फुटणार का? या चर्चा सुरु झाल्या आहेत.

काय म्हणाले होते अजित पवार?
तीन पक्षांचं सरकार स्थापन झाल्याने तुमचा हातातोंडाशी आलेला घास गेला. हे सरकार सहा महिन्यात जाईल असं भविष्य तुम्ही सांगत होतात. मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित, पदवीधर मतदारांनीही भाजपाला नाकारलं. येत्या चार महिन्यात तुमच्याकडचे किती आमदार आमच्याकडे येतील हे तुम्हाला कळणारही नाही असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवलं त्यावरही छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. प्रत्येक पक्षाची आपली ध्येयंधोरणं असतात. ती ध्येयंधोरणं मुख्यमंत्र्यांना सांगितली जातात. अनेकदा शरद पवार हेदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सूचना करतात. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी मागासवर्गीय घटकांबद्दल सूचना केल्या तर त्यावर नाराजीचं कारण नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.