विकासाचा मुद्दा बाजुला ठेवून भाजपा सरकार मंदिर – मशिदीचा मुद्दा घेवून धनाचा धंदा करत आहेत. वाईट याच गोष्टीचे वाटते की यामध्ये सुशिक्षित लोक आंधळे बनत चालले आहेत. हा निवडणूक जुमला असून याकडे लक्ष देवू नका असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी उल्हासनगर येथील जाहीर सभेत केले. भाजपाला मंदिर नाही बनवायचे तर सरकार बनवायचे आहे. म्हणून मंदिराचा मुद्दा घेवून मंदिर मशिदीचा मुद्दा घेवून दंगा घडवायचा आहे असा आरोपही भुजबळ यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगर येथील परिवर्तन यात्रेत बोलताना ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी या जाहीर सभेत पुन्हा एकदा भाजपा, मोदी आणि शिवसेनेच्या कारभारावर शरसंधान साधले. आमचा राजा जास्त उदार झाला आहे. परंतु पुन्हा फसलात तर लक्षात ठेवा तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. आता यांचे अच्छे दिन कमी उरले आहेत असेही आमदार छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. आपल्या सोबत मन की बात आणि अदानी – अंबानी सोबत धन की बात असे बोलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातची माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली. आज देशावर अशा लोकांचे राज्य आहे जे लोक आदिवासींना आदिवासी नाही तर वनवासी समजत आहेत. आज मनुवादी विचारांचे पुरस्कार करणारे सरकार असल्याची टीकाही छगन भुजबळ यांनी केली.

काळा पैसा सापडला नाही परंतु नोटबंदीमध्ये गोरगरीब मरण पावले. कुठं दहशतवाद संपला. कुठंय काळापैसा असा सवालही छगन भुजबळ यांनी सरकारला केला. ज्याने कधी खेळण्यातली विमानं कधी बनवली नाहीत त्या अंबानीला राफेलची विमानं बनवण्याचा ठेका देण्यात आला. असा आरोप करताना आम्ही हरलो परंतु आमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे की आम्ही पुन्हा सत्तेत येणार हे नक्की आहे असा विश्वासही आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.