छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत कमालीची वाढ झाल्याने तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या गोटात बरीच अस्वस्थता आहे. ही प्रस्थापितविरोधी लाट तर नाही ना, या शंकेने या पक्षाच्या अनेक नेत्यांना सध्या ग्रासले आहे.
या राज्यातील संपूर्ण बस्तर विभाग व राजनांदगाव जिल्ह्य़ातील एकूण १८ मतदारसंघात सोमवारी मतदान झाले. दरवेळी या भागात नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे कमी मतदान होते. यावेळी त्यात वाढ झाली. मतदानात झालेल्या अचानक वाढीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवायला सुरुवात झाली असली तरी भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थता आहे. हे वाढलेले मतदान प्रस्थापितविरोधी लाट आहे, असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी करणे सुरू केल्याने भाजप नेत्यांच्या अस्वस्थतेत आणखीच भर पडली आहे. नक्षलवादग्रस्त कोंटा, बिजापूर, नारायणपूर भागात दरवेळी २५ ते ३० टक्के मतदान होते. यावेळी येथेही ४० टक्के मतदान झाले. नारायणपूरला तर ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. नक्षलवाद्यांचा हिंसाचार झालेल्या अंतागड व मोहला मानपूर मतदारसंघात अनुक्रमे ६७ व ८४ टक्के मतदान झाले. नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाया घडवून आणलेल्या दंतेवाडा मतदारसंघात ६५ टक्के मतदान झाले. गेल्या वेळी येथे केवळ ५४ टक्के मतदान झाले होते. वाढलेले हे मतदान सरकारविरोधी तर नाही ना, अशी शंका आता भाजपच्या वर्तुळात बोलून दाखवली जात आहे.
उल्लेखनीय म्हणजे, प्रचाराच्या काळात या भागात नरेंद्र मोदींच्या तुलनेत सोनिया व राहुल गांधी यांच्या सभांना जास्त गर्दी झाली होती. ती बघून काँग्रेस यावेळी या भागात चांगले प्रदर्शन करणार, असा अंदाज राजकीय निरीक्षकांच्या वर्तुळात व्यक्त होत होता. वाढलेल्या मतदानामुळे या अंदाजाला आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे भाजपच्या वर्तुळात अस्वस्थता आहे. प्रचाराच्या आधी जाहीर झालेल्या जनमत चाचण्यांमध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हा अंदाज खोटा ठरेल की काय, या शंकेने आता भाजपच्या नेत्यांना घेरले आहे.
दुसऱ्या टप्प्यात ७२ जागांसाठी मतदान होणार आहे. उत्तर छत्तीसगडमध्ये असलेल्या या जागांवर भाजप व काँग्रेसमध्ये काटय़ाची टक्कर आहे. गेल्या वेळी या दोन्ही पक्षाला प्रत्येकी ३५ जागा मिळाल्या होत्या. बस्तरमधील १८ पैकी १५ जागा जिंकून भाजपने तेव्हा बहुमत गाठले होते. या आकडेवारीमुळेच या राज्यातील सत्तेचा मार्ग बस्तरमधून जातो, असे बोलले जाते. नेमके येथेच मतदान वाढल्याने भाजपची चिंता वाढली आहे. या घडामोडींमुळे काँग्रेसच्या वर्तुळात मात्र आनंदाचे वातावरण आहे. दुसऱ्या टप्प्यातही मतदान वाढले तर भाजपचा पराभव अटळ आहे, असे या पक्षाचे नेते सांगत आहेत. भाजपने मात्र वाढलेले मतदान हा रमणसिंगांवरील विश्वासाचा भाग आहे, असा दावा केला आहे.