मागील काही आठवड्यापासून सुरू असलेल्या सारथी संस्थेसंदर्भात वादावर आज पडदा पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करत बैठक बोलावली होती. त्या बैठकीत संस्थेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान, बैठकीला उपस्थित असलेले छत्रपती संभाजीराजे भोसले यांना तिसऱ्या रांगेत बसवल्यावरून गोंधळ झाला होता. या गोंधळावर छत्रपती संभाजीराजे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई येथे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सारथी संस्थेसंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीत छत्रपती संभाजीराजे तिसऱ्या रांगेत बसलेले पाहून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी गोंधळ घालत त्यांना व्यासपीठावर बसवण्याची मागणी केली होती. हे वृत्त बाहेर येताच छत्रपती प्रेमींनी संताप व्यक्त केला होता.

बैठक संपल्यानंतर तसेच सारथीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांची घोषणा करण्यात आल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करून भूमिका मांडली. “माझ्या मान अपमानापेक्षा समाजाचं काम मार्गी लागलं हे महत्त्वाचं! छत्रपती घराण्याचे संस्कारच आहे की, आपण रयतेचे सेवक आहोत. स्वतःपेक्षा रयतेला महत्व देणारे उज्ज्वल विचार असलेले माझे घराणे आहे. त्यामुळे समाज हित हीच माझी प्राथमिकता आहे. छत्रपती घरण्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या शिवभक्तांना मी सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल. समाजाने जो सारथीचा लढा उभा केला होता, मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या, त्याच्या पूर्णतेची सकारात्मक सुरुवात झाली हे जास्त महत्वाचे. आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, माझ्यावर प्रेम व्यक्त केलं, ते पाहून मला समाधान वाटलं. तुम्हा सर्वांचं छत्रपती घरण्यावर असलेला हा विश्वास मी जपण्याचा प्रयत्न करेन. संभाजी छत्रपती,” असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

सारथीला आठ कोटी देणार…

अजित पवार यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सारथीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. “सारथी संस्था बंद होणार नाही. मागील काही काळात गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनामध्ये चुकीचा मेसेज गेला होता. मात्र, हे होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अखत्यारित घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात येईल. त्याचबरोबर सारथीला उद्याच विजय वडेट्टीवार हे आठ कोटी रुपयांची मदत देतील,” असं अजित पवार म्हणाले.