हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संक्षयित आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगण पोलिसांनी दिली आहे. सकाळीच आलेल्या या वृत्ताची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा आहे. अनेकांनी या एन्काउंटरप्रकरणी पोलिसांचे अभिनंदन केले असून काहींनी या एन्काउंटरबद्दल संक्षय व्यक्त केला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनीही ट्विट केले आहे.

उदयनराजेंनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी तेलंगण पोलिसांचे अभिनंदन केलं आहे. “हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले. तेलंगणा पोलिस दलाचे मनःपूर्वक अभिनंदन!,” असं उदयनराजेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र काही तासांनंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.

नक्की काय घडलं

काल (गुरुवारी) रात्री पोलिस चारही आरोपींना घटनास्थाळी घेऊन गेले होते. नक्की काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी त्यांना पोलिस बंदोबस्तामध्ये घेऊन जाण्यात आले होते. मात्र ज्यावेळी त्यांना काय घडलं हे सांगण्यासाठी मोकळं सोडण्यात आलं तेव्हा त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. पोलिसांनी त्यांना थांबवण्यास सांगितले. मात्र अनेकदा सांगूनही ते थांबले नाही तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्येच चौघाचाही मृत्यू झाला.