राज्यात दूध दरवाढीसाठी आंदोलन सुरु असून छावा संघटनाही या आंदोलनात सहभागी झाली आहे. छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी आंदोलनासंबंधी एक व्हिडीओ ट्विटरला पोस्ट केला असून दुधाला भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच दुधात ठेवलं आहे. दरम्यान सांगलीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाची वाहतूक करणारा टँकरच फोडला आहे.

धनंजय जाधव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “संकट जावे म्हणून पूर्वी देव पाण्यात ठेवले जायचे, आता शेतकऱ्यांचे संकट कमी होऊन दुधाला भाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणास आम्ही छावा संघटनेने दुधात ठेवले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा”.

आणखी वाचा- दूध दर आंदोलनाला सुरुवात, स्वाभिमानीने फोडला दुधाचा टँकर; हजारो लिटर दूध सोडलं रस्त्यावर

यासोबत त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी आम्ही दुधाच्या आंदोलनात सक्रीय सहभागी होत असून प्रश्न मार्गी लावल्यास लॉकडाउन संपल्यानंतर आंदोलन तीव्र होऊ शकतं असा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.

पाहा फोटो >> दूध दर आंदोलन : लाखो लिटर दूध रस्त्यावर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दर वाढीसाठी मंगळवारी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी अशी स्वाभिमानीची मागणी आहे. याशिवाय केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.