पावसाने ओढ दिल्याने डाळींचे दर कडाडले असून किरकोळ बाजारात डाळीपेक्षा चिकनची किंमत स्वस्त झाली आहे. तूर डाळीचा दर १६० रुपयांवर पोहोचला असताना चिकनचा दर मात्र किलोला १०० रुपयांवर आहे. श्रावण महिना असल्याने मांसाहारास मागणी कमी आहे, तर दुसरीकडे डाळींच्या दराने आकाश गाठल्याने बाजारपेठेत ही गंमत पाहण्यास मिळत आहे.
श्रावणात रानातील रानभाज्यांबरोबरच कडधान्येही या हंगामात उपलब्ध होतात. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने मूग, तूर, मटकी ही कडधान्ये पेरली तरी पावसाअभावी करपून गेली. नापेर राहिलेले जिराईत कडधान्यासाठीच सोडण्यात आल्याने बऱ्याच भागात कडधान्याच्या पेरण्याही झाल्या नाहीत. येणाऱ्या हंगामात कडधान्याचे उत्पादन किरकोळ होणार असल्याचे लक्षात येताच बाजारपेठेतील डाळींची आवक मंदावली आहे. असलेल्या डाळींचा साठाही अचानक गायब होत आहे. बाजारात सौद्याला डाळी जास्त येत नसल्याने दर कडाडले आहेत. तूरडाळीचा सध्याचा दर १५५ ते १६०, मूगडाळीचा दर १३०, तर मटकीचा दर ७० रुपये झाला आहे. तर  हरभरा डाळीला मागणी जास्त असल्याने या डाळीचे भावही कडाडले आहेत. गेल्या महिन्यात ५० रुपयांच्या आसपास दर असणाऱ्या हरभरा डाळीचा दर आता ६५ रुपयांवर गेला आहे. दिवाळीपर्यंत हा दर ७५ रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे.बाजारात डाळीचे दर वाढल्याने ग्राहकांनीही पाठ फिरवली असल्याने डाळीला उठाव नसल्याचे सांगलीतील डाळींचे व्यापारी विवेक शेटे यांनी सांगितले. दरम्यान, एरव्ही सामान्यांसाठी महाग असलेल्या चिकनच्या दरात मात्र सध्या मोठय़ा प्रमाणात घट होत आहे. दोन आठवडय़ापूर्वी १६० रुपये किलोवर असलेले चिकन आता १०० ते ११० रुपयांवर आले आहे. यामुळे बाजारात गमतीने डाळीपेक्षा चिकन परवडत असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.

पावसाअभावी भाज्यांचे दरही कडाडले आहेत. वांगी, गवार, भेंडी या भाज्यांचे दर ५० रुपये किलोवर गेले आहेत. पालक, मेथी, शेपूसारख्या पालेभाज्यांच्या जुडय़ा १५ ते २० रुपयांनी विकल्या जात आहेत. तांदळ, चिघळ, लालमाठ या रानभाज्या बाजारातून दुर्मीळ झाल्या आहेत.