आरोपीच्या अटकेसाठी गंगाखेड पोलीस ठाण्यावर जमाव

गंगाखेड येथील ख्वॉजा मोहम्मद सोनाजी कुरेशी (वय ३५) यांचा गळा चिरून खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. कुरेशी यांचा खून करणाऱ्या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी त्यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळच्या सुमारास गंगाखेड पोलिस ठाण्यात आणण्यात आला. ख्यॉजा यांच्या मारेकऱ्यांना अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी आरोपीस अटकेचे आश्वासन दिल्यानंतर हा जमाव तेथून बाहेर पडला.

ख्वॉजा मोहम्मद यांचे परभणी तालुक्यातील पोखर्णी फाटा येथे ठोक कोंबडय़ा विक्रीचे दुकान आहे. त्या ठिकाणी ख्वॉजा मोहम्मद दररोज गंगाखेडहून येऊन व्यापार करतात. शुक्रवारी दुपारच्या वेळी ख्वॉजा मोहम्मद व त्यांचे दोन भाऊ साळापुरी येथे गेले होते. त्या ठिकाणी जेवण करून दोन भाऊ इतर ठिकाणी गेले व ख्वॉजा हा पोखर्णी फाटा येथे आला. ख्वॉजा यांचे बसस्थानकापासून काही अंतरावर दुकान असल्यामुळे फारशी त्या ठिकाणी वर्दळ नसते. सायंकाळी सव्वा सातच्या  सुमारास ख्वॉजा यांचा गळा चिरून खून झाल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर दैठणा पोलिसांनी धाव घेत ख्वॉजा यांचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर ख्वॉजा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. त्याठिकाणी ख्वॉजा यांचे इनकॅमेरा शवविच्छेदन झाले.शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह गंगाखेड येथे आणण्यात आला. हा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आला. यावेळी मोठा जनसमुदाय पोलीस ठाण्याबाहेर थांबलेला होता. ख्वॉजा यांचा मृतदेह आणल्यानंतर आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, आ. बाबाजानी दुर्राणी, रिपाइंचे गौतम भालेराव, डॉ. सिद्धार्थ भालेराव हे पोलीस ठाण्यात पोहोचले. ख्वॉजा यांचा खून करणाऱ्यांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. सायंकाळच्या वेळी परभणीहून अपर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे हे ही गंगाखेडमध्ये पोहोचले आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार केंद्रे व दुर्राणी यांनी प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी एस. पी. खान, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांची भेट घेऊन आरोपीस अटक करण्याची मागणी केली. अपर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी मयताच्या नातेवाईकास व जमावास शांत करून आरोपीचा शोध घेऊन लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. त्यानंतर रात्री उशिरा अंत्यविधीसाठी प्रेत नातेवाईकांनी ताब्यात घेतले.