चिकन ५० रुपये प्रति किलो, तर अंडी ५० रुपये डझन

पालघर : सरकारने तसेच विविध संशोधन संस्थांनी चिकन, अंडी व मटण याचा करोना विषाणूशी काडीमात्र संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही नागरिकांमध्ये आजही भीतीचे वातावरण आहे. मांसाहार घेण्यास नागरिक धजावत नाहीत. परिणामी चिकन, मटण व्यवसायावर संक्रांत ओढवली आहे. चिकन व अंडीचे दर थेट जमिनीवर आल्याने पोल्ट्री व्यावसायिक यांच्यासह किरकोळ विक्रेतेही हवालदिल झाले आहेत.

एकीकडे नागरिकांनी मांसाहार बंद केल्याने दुसरीकडे भाजी व फळविक्रेत्यांचा धंदा तेजीत आहे. नागरिक मोठय़ा प्रमाणात शाकाहाराकडे वळल्यामुळे फळे-भाजीपाल्याची मागणी वाढली असून बाजारपेठेतील आवकही वाढली आहे. मात्र, ही मागणी अशीच वाढत राहिली तर भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याचप्रमाणे मागणीपेक्षा मासेही कमी प्रमाणात येत असल्याचे माश्याचे दरही चढे राहण्याची शक्यता आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमावरून फिरत असलेल्या निरोपांमुळे नागरिक संभ्रमीत असून यादरम्यान चिकन-मटण न खाण्याच्या चर्चा रंगत आहेत. समाज माध्यमांवरील या चर्चामुळे नागरिक मांसाहार सोडत असल्याचे चित्र संपूर्ण जिल्हाभर दिसत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक यांच्यासह चिकन-मटण किरकोळ विक्रेते यांच्या दुकानावरील गर्दी ओसरली असून त्याचा थेट परिणाम दरफलकांवर झालेला आहे.

महिन्याभरापूर्वी पोल्ट्रीमधून ७५ रुपये प्रति किलोने ठोक भावाने विक्री होणारे चिकन बुधवार अखेर १२ रुपये प्रति किलो इतक्या कमी दराने विकली जात होती. याचाच अर्थ चिकनची मागणी पूर्णपणे थंडावली असून त्याचा पोल्ट्री व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. तर किरकोळ विक्रेत्यांकडे महिन्याभरापूर्वी १४०-१८० रुपये प्रति किलो दराने विकले जाणारे चिकन बुधवार अखेर काही ठिकाणी ५० रुपये प्रति किलो तर काही ठिकाणी शंभर रुपये प्रति किलो इतक्या कमी दराने विक्री होताना पाहावयास मिळाले. याचबरोबरीने अंडय़ांचा दरही कमी झालेला आहे. ७० ते ८० रुपये प्रति डझन असणारी अंडी बुधवारअखेर पन्नास रुपये प्रति डझन रुपये दराने मिळत होती.

करोना विषाणूचा चिकन, मटणाशी काहीही संबंध नसताना नागरिक अजूनही जागरूक झालेले नाही. याचबरोबरीने समाजात पसरत असलेल्या अफवांमुळे चिकन मटण व अंडी घेण्यासाठी नागरिक धजावत नसल्याचे एका विक्रेत्याने म्हटले आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ  नये. चिकन-मटण व अंडी हे शिजवून खाल्लय़ामुळे काहीही दुष्परिणाम होत नाही. याउलट शरीराला यामुळे ताकद मिळते. नागरिकांनी जागरूक होऊन मांसाहार टाळू नये, असे आवाहन चिकन व मटण विक्रेत्यांच्या संघटनांनी केले आहे.

मटणाचे दर मात्र स्थिर

चिकन व अंडी यांचा दर कमी झाला असला व मटण खरेदी करण्यामध्ये कमालीची घट झाली असली तरी मटण व्यावसायिकांनी बोकड दराच्या तुलनेत परवडत नसल्यामुळे अजूनही भाव कमी केलेले नाहीत. दरम्यान, खवय्यांकडून मागणी मात्र रोडावली आहे. काही मटण विक्रेत्यांकडे काहीही फरक जाणवला नाही. त्यांच्याकडे ग्राहक येत असल्याचे ते सांगत आहेत.

मांसाहार याचा करोनाशी संबंध आहे असे अजून कोणीही सिद्ध केलेले नाही. हे खोटे आहे. शुद्ध,स्वच्छ व शिजविलेले मांसाहार सेवन केल्याने कोणताही आजार होईल याची शक्यता नाही. त्यामुळे मांसाहाराला घेऊन नागरिकांनी घाबरून जाऊ  नये व कुठल्याही अफवांना बळी पडू नये.

– डॉ.कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक,पालघर