भाजपला जनतेने पाच वर्षे संधी दिली, मात्र काहीच काम न केल्याने मुख्यमंत्र्यांना महाजनादेश यात्रा काढावी लागत आहे. सत्तेतील भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष यात्रा काढत आहेत, त्यांच्या या यात्रा मुख्यमंत्री पदासाठी आहेत. मात्र महाराष्ट्र कोणाची जहागिरी नाही, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे जनताच ठरवील, राज्य खड्डय़ात घातल्याची कबुलीच महाजनादेश यात्रेतून मुख्यमंत्री देत आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आज, बुधवारी लगावला.

विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे. या यात्रेचे काल, मंगळवारी रात्री नगरमध्ये आगमन झाले. आज शहरातील चौपाटी कारंजा भागात झालेल्या सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. या वेळी माजी उमुख्यमंत्री अजित पवार, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, माजी मंत्री फौजिया खान, आ. विद्या चव्हाण, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, पक्षनिरीक्षक अंकुश काकडे आदी उपस्थित होते. सभेपूर्वी शहरातून नेते व पदाधिकाऱ्यांची ढोल ताशांसह फटाके फोडत रॅली काढण्यात आली. या वेळी दिवंगत माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सत्ताधाऱ्यांना अपयश आल्यानेच यात्रा काढाव्या लागत असल्याचा आरोप करुन डॉ. कोल्हे म्हणाले,की पाच वर्षांपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीने आरोपांची राळ उडवत, बदनामी करत सत्ता मिळवली, या आरोपांचे काय झाले पुढे? काहीच निष्पन्न झाले नाही. पारदर्शक कारभाराचे आश्वासन दिले, परंतु आता काहीच काम न केल्याने महाजनादेश यात्रा काढावी लागत आहे. राज्यात एकीकडे पूर व दुसरीकडे दुष्काळ असताना मुख्यमंत्री यात्रा काढत आहेत, अजित पवार यांनी आठवण करुन दिल्यावर मुख्यमंत्र्यांनी यात्रा स्थगित केली. यात्रा काढण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी किती सिंचनाचे नवीन प्रकल्प काढले, किती उद्योग आले, किती रोजगार निर्मिती झाली, याची श्वेतपत्रिका काढावी.

महाजनादेश यात्रा जेथे जात आहे, तेथे काळे झेंडे दाखवले जात आहेत. ही लादलेली यात्रा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेचे लोक प्रेमाने स्वागत करत आहेत, रयतेचे राज्य येण्यासाठीच शिवस्वराज्य यात्रा असल्याचा दावा डॉ. कोल्हे यांनी केला. केंद्रातील सरकार बहुमताचे नाही,तर मशिन घोटाळ्याचे आहे, ईव्हीएमबद्दल जनतेच्या मनात संशय आहे, हा संभ्रम दूर करण्यासाठी व एकदाचे ‘दूध का दूध, पानी का पानी’ होण्यासाठी मतपत्रिकांवर निवडणुका घ्या, अशी मागणी त्यांनी केली.

अपयशी राज्य सरकार घालवा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राज्यात बेकारी वाढते आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, महिला असुरक्षित आहेत, राज्य कर्जबाजारी झाले आहे, पूर परिस्थितीचे नियोजन नसल्याने खेळखंडोबा निर्माण झाला आहे, अशी टीका त्यांनी केली. महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी नगर शहरासाठी ३०० कोटी देण्याचे आश्वासन दिले, परंतु ते केवळ गाजरच ठरले, साकळी योजनेसाठी दिलेला शब्दही मुख्यमंत्र्यांनी फिरवला, धनगर, लिंगायत समाजाच्या आरक्षणाबद्दलही खोटीनाटी आश्वासने दिली, असा आरोप त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीसाठी देशाचे मुद्दे होते, परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांच्या अपयशाकडे लक्ष द्या, असे आवाहन पवार यांनी केले. आ. संग्राम जगताप यांनी प्रास्ताविक केले.

शक्तिप्रदर्शन.. मात्र हातचे राखूनच

शिवस्वराज्य यात्रेसाठी राष्ट्रवादीकडून शक्तिप्रदर्शन केले जाईल, अशी चर्चा होती. मात्र पक्षाच्या शहर संघटनेने मर्यादित स्वरुपातच शक्तिप्रदर्शन केले. वातावरण निर्मिती झालीच नाही. मिरवणुकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांऐवजी केवळ आ. संग्राम जगताप यांचेच फलक कार्यकर्त्यांनी घेतले होते. घोषणाही पक्ष किंवा नेत्यांऐवजी केवळ आ. जगताप यांच्याच नावाच्या दिल्या जात होत्या. मिरवणुकीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यात्रेदरम्यान, जिल्ह्य़ात निघोजपर्यंत (पारनेर) आलेले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील नगरमध्ये मात्र अनुपस्थित होते. पूर परिस्थितीमुळे ते आपल्या मतदारसंघात परत गेल्याचे सभेत सांगण्यात आले.