मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर टीका

यापूर्वी ‘टंचाईसदृश’ असा शब्द वापरणाऱ्यांनी ‘दुष्काळसदृश’ या शब्दावरून राजकीय शब्दच्छल करू नये, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता येथे केली. ते बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

राज्य शासनाने काल जाहीर केलेल्या ‘दुष्काळसदृश स्थिती’वर भाष्य करताना पवार यांनी राज्यात ‘दुष्काळसदृश’ नव्हे तर ‘दुष्काळ’ जाहीर करा अशी मागणी केली होती. या मागणीवर जोर देताना त्यांनी ‘सदृश’ या शब्दाला आक्षेप घेतला होता. याला उत्तर देताना फडणवीस यांनी वरील टीका केली.

मुख्यमंत्री म्हणाले, की खरे तर राज्यात आघाडी सरकारच्या काळात अनेकदा दुष्काळ असतानाही त्यांनी ‘दुष्काळ’ हा शब्दच हद्दपार केला होता. आम्ही त्यात सुधारणा करुन ‘दुष्काळसदृश’ परिस्थिती अशी सुधारणा केली आहे. आघाडी सरकारच्या काळात प्रत्येक वेळी त्यांनी ‘टंचाईसदृश’ स्थितीच जाहीर केल्याची आठवणही त्यांनी विरोधकांना करून दिली.

विरोधकांची दुष्काळाची मागणी राजकीय हेतूने असल्याची टीका करत फडणवीस म्हणाले, की राज्यातील दुष्काळी परिस्थतीशी सामना करण्यास सरकार कटिबध्द आहे.

राज्यातील भूजल पातळी कमी झाली असल्याची ओरड करणाऱ्यांवरही मुख्यमंत्र्यांनी टीका केली. ते म्हणाले, की यंदा पाऊस कमी झाल्याने जमिनीतील पाण्याचा उपसा वाढल्याने ही पातळी कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र या अशा दुष्काळी स्थितीत उपसा करण्यासाठी जमिनीत जे पाणी उपलब्ध झाले आहे, त्यामागे बहुतांश ठिकाणी ‘जलयुक्त शिवार’चे यश आहे. लोकांनी श्रमदान करून हे अभियान यशस्वी केले असून यावर टीका करून लोकांच्या श्रमाचा अवमान करू नका, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.