News Flash

विरोधक उदासीन आणि गोंधळलेले – देवेंद्र फडणवीस यांची टीका

हिवाळी अधिवेशनात एकूण १३ विधेयके दोन्ही सभागृहात मंजूर झाली

देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्ष उदासीन आणि गोंधळलेला असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपुरात केली. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशाचा शेवट झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढविला.
ते म्हणाले, अधिवेशनाच्या सुरूवातीपासून विरोधक गोंधळलेले आणि उदासीन होते. कोणता विषय लावून धरला पाहिजे, याची त्यांनाच कल्पना नव्हती. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायला लावायच्या आणि उत्तर ऐकायला थांबायचे नाही, असा पळपुटेपणा विरोधकांनी करायला नको होता. बेछूट आरोप करून त्याचे उत्तर ऐकायला नको म्हणूनच त्यांच्याकडून असे केले जात होते. मात्र, विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी सत्य सभागृहापुढे येणार आणि आम्ही ते आणलेच, असे फडणवीस यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनात एकूण १३ विधेयके दोन्ही सभागृहात मंजूर झाल्याचे सांगून ते म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी विरोधक करत असले, तरी आतापर्यंतचा अनुभव असा आहे की कर्जमाफीचा लाभ हा केवळ संपन्न शेतकऱ्यांनाच होतो. सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांना मदत करण्याबरोबरच आम्ही शेतीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
डाळींच्या साठ्यात कुठलाही घोटाळा झालेला नाही. त्यामुळे त्याची चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही फडणवीस म्हणाले. नॅशनल हेराल्डप्रकरणी राज्य सरकारने चौकशीसाठी एक सदस्यीय समिती नेमली आहे. तिचा अहवाल आल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हिट अॅंड रन प्रकरणी अभिनेता सलमान खान विरोधात सर्वोच्च न्यायालयात जायचे की नाही, याचा निर्णय विधी विभागाकडून अहवाल आल्यावरच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अद्याप विधी विभागाचा अहवाल आलेला नाही. तो आल्यावर राज्य सरकार व्यक्तीनिरपेक्षपणे पुढील निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2015 5:32 pm

Web Title: chief minister devendra fadnavis criticized opposition parties 2
टॅग : Devendra Fadnavis
Next Stories
1 राष्ट्रगीताविना विधान परिषदेचे कामकाज स्थगित केल्याने सत्ताधारी संतप्त
2 शिवसेनेकडून प्रतिकात्मक हुतात्मा स्मारकाची उभारणी
3 संगणक परिचारकांचे आंदोलन अखेर मागेसंगणक परिचारकांचे आंदोलन अखेर मागे
Just Now!
X