News Flash

आम्हाला जनताच प्रश्न विचारु शकते

साठ वर्षांत तुम्ही काय केले आणि आम्ही काय केले याचा हिशेब आकडेवारीनुसार सांगू शकतो.

परभणीतील समाधान शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पाणीपुरवठा व  स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

परभणीच्या सभेत मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका

परभणी : साठ वर्षांत तुम्ही काय केले आणि आम्ही काय केले याचा हिशेब आकडेवारीनुसार सांगू शकतो. सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करून राजकारण करणाऱ्यांनो, ५० वर्षांत ठीक वागला असता तर तुमची अशी अवस्था झाली असती का? आम्हाला जनताच प्रश्न विचारु शकते आणि आम्ही जनतेशीच उत्तरदायी आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

येथील स्टेडियम मदानावर समाधान शिबिराचा समारोप व राष्ट्रीय महामार्गाचे ई भूमिपूजन कार्यक्रम पार पडला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार मोहन फड, तानाजी मुटकुळे, रामराव वडकुते, जि.प.अध्यक्षा उज्ज्वला राठोड, महापौर मीनाताई वरपुडकर, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, माजी आमदार विजय गव्हाणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, महानगराध्यक्ष आनंद भरोसे आदींसह पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

खासदार संजय जाधव यांनी यापूर्वीच समाधान शिबिरावर बहिष्कार घोषित केल्याने शिवसेनेच्यावतीने कोणीही पदाधिकारी हजर नव्हता. कार्यक्रम शासकीय असल्याचे सांगितले गेले, तरीही मुख्यमंत्र्यांनी मात्र थेट राजकीय भाषण करत विरोधकांवर टीकास्त्र सोडले. आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीने दिलेली कर्जमाफी संपूर्ण मराठवाडय़ासाठी १४०० कोटींची होती, तर आम्ही परभणी जिल्ह्यसाठी दिलेली कर्जमाफीच ७५३ कोटी रुपयांची आहे. शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत ही योजना चालूच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. साडेतीन वर्षांत जिल्ह्यला ७९३१ कोटी रुपये देण्यात आल्याचेही ते म्हणाले. सीमेवर लढणाऱ्या  शहिदांच्या कुटुंबीयांना  मागचे सरकार आठ लाख द्यायचे. आम्ही आता संबंधित कुटुंबास २५ लाख रुपये आणि पाच एकर जमीन देतो,  असे या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पालम तालुक्यातील कोनेरवाडी येथील शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांच्या मदतीचा धनादेशही या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.

आपल्या भाषणात गडकरी यांनी, ऊर्जा, पाणी, वाहतूक आणि दळणवळण या आधारेच देशाचा विकास होत असल्याचे सांगून महाराष्ट्रातील पाच लाख कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामांपैकी एक लाख कोटी रुपयांची कामे मराठवाडय़ात होत आहेत, असे ते म्हणाले. शेतमालाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारावरुन निश्चित होत असल्याने किमान आधारभूत किमतीपेक्षाही त्या कोसळतात. तरीही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतमालाला किंमत आणि तरुणांना रोजगार यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. या वेळी लोणीकर यांनी प्रास्ताविकात गडकरी व फडणवीस यांचे आभार मानले. या प्रसंगी दानवे, ज्ञानोबा मुंडे, विजय गव्हाणे, राहुल लोणीकर यांचीही भाषणे झाली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 4:00 am

Web Title: chief minister devendra fadnavis in e bhumi pujan of national highway
Next Stories
1 बलात्कार पीडित महिलेला गर्भपाताची परवानगी
2 मराठी वाचन क्षमतेत केवळ साडेचार टक्क्य़ांनी वाढ
3 अर्जुन खोतकरांचे रावसाहेब दानवेंना आव्हान
Just Now!
X