बिहार निवडणुकीनंतर पुरस्कारवापसी कशी काय थांबली, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित केला. आपला देश मूळातच सहिष्णू असून, असहिष्णुतेवरून जी काही टीका करण्यात येत आहे ती राजकीय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त विधानसभेत विशेष चर्चा घडवून आणण्यात आली. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, भारतीय घटनेचा मूलभूत ढाचाच मजबूत आहे. तो कोणीही बदलू शकणार नाही. संसद सुद्धा त्यामध्ये बदल करू शकणार नाही. असे असतानाही केवळ राजकीय कारणांसाठी असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून जी पुरस्कारवापसी सुरू होती, ती बिहार निवडणुकीनंतर कशी काय थांबली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यात खैरलांजी दलित हत्याकांड प्रकरण घडले, त्यावेळी कोणी असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करीत पुरस्कार का परत केले नव्हते, याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.