अजित पवार यांची फडणवीस यांच्यावर टीका

औरंगाबाद : मराठवाडय़ात दुष्काळ आहे आणि लातूरमध्ये मुख्यमंत्री म्हणतात, २०१९ मध्ये मीच मुख्यमंत्री होणार. अजूनही ते स्वप्नात आहेत. दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या हव्या आहेत, असा सवाल करत, या सरकारने झोपेचे सोंग घेतले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने ‘संविधान बचाओ, देश बचाओ’ या मोहिमेंतर्गत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यास खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची या वेळी उपस्थिती होती.

दुष्काळ, महागाई आणि भारनियमनावरून अजित पवार यांनी राज्य सरकारवर मंगळवारी जोरदार टोलेबाजी केली. आज सकाळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे औरंगाबादला पोहोचल्यानंतर सुभेदारी विश्रामगृहावरील वीज गायब होती. अचानक सुरू झालेल्या भारनियमनावर टीका करताना ते म्हणाले, राज्यात कोणत्याही वीज निर्मिती केंद्रात पुरेसा कोळसा नाही. केवळ दोन दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. कोळसा आणता येत नाही का, असा प्रश्न विचारत दुष्काळ आणि महागाईवरूनही त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली. महिलांवरील अत्याचाराचा मुद्दाही या दोन्ही नेत्यांनी उपस्थित केला.

सत्ताधारी पक्षातील एक आमदार मुलींना पळवून आणण्याची भाषा करतो, तरीही मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे गृहमंत्रालय आहे ते याविषयी भाष्य करत नाहीत. त्यांनी या विषयावर भाष्य करणे आवश्यक वाटत असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. अजित पवार यांनीही हा विषय त्यांच्या भाषणात अधिक आक्रमकपणे मांडला. राम कदम यांचे नाव घेऊन सत्ताधारी पक्षाचा आमदार मुली पळवून नेण्याची भाषा करतो. एवढी कसली नशा, हा कसला माज, असा सवाल त्यांनी केला. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अधिक कठोर कायदे करण्यापासून कोणी रोखले आहे? त्यांनी कठोर कायदा करावा, त्यास आम्ही पाठिंबा देऊ, असे पवार म्हणाले. संविधान बदलण्याची भाषा केंद्रातील मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केली होती. त्यांना धर्मनिरपेक्ष शब्द घटनेतून काढायचा आहे. हा शब्द काही टोचतो का, असे म्हणत संविधान वाचविण्यासाठी सुरू केलेले राष्ट्रवादीचे आंदोलन महत्त्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान आणि चित्रा वाघ यांचीही भाषणे झाली. तसेच धनंजय मुंडे यांनीही संविधान बदलण्याचा भाजप आणि रा. स्व. संघाचा अजेंडा असल्याचे सांगितले.

भारनियमनाचा फटका; इमरतीचा आनंद

सकाळी औरंगाबाद शहरात आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भारनियमनाचा फटका सहन करावा लागला. त्या अनुषंगाने सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून राज्य सरकारला वीजप्रश्नी जाबही विचारला. त्यांनी व्यापारी आणि शहरातील काही लेखक, कवी मंडळींशीही चर्चा केली. तसेच शहरातील प्रसिद्ध इमरती आणि भजी खाण्याचाही आस्वाद घेतला.