काँग्रेसची टीका; पूरस्थितीची पाहणी करताना शहांसोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा आहेत की देवेंद्र फडणवीस, असा सवाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.

कर्नाटकातील पूरस्थितीची पाहणी करता करता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ातील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. मात्र त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हते तर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा होते, त्याला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे.

पूरग्रस्त महाराष्ट्राला मदत देण्याबाबत केंद्र सरकारतर्फे पूर्णपणे अनास्था दिसत असून अद्यापपर्यंत राज्याला कोणतीही मदत दिली नाही. विरोधी पक्षांच्या रेटय़ामुळे नाइलाजाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकचा हवाई दौरा करत असताना कोल्हापूर, सांगलीच्या पुराचे हवाई पर्यटन केले.  परंतु  महाराष्ट्रातल्या पूरस्थितीची पाहणी अमित शाह यांनी  कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यासोबत केली. महत्त्वाचे केंद्रीय मंत्री नैसर्गिक आपत्तीची पाहणी करताना त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री किंवा अन्य एकही मंत्री नसावा, हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच  घडले आहे, असे थोरात म्हणाले.

दादर येथील टिळक भवन येथे मंगळवारी प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पूरस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की, राज्य आणि केंद्र  सरकारने  पूरस्थितीकडे गांभीर्याने पाहिले नाही म्हणून ही स्थिती अधिक बिकट  झाली.

मुख्यमंत्र्यांकडून चंद्रकांत पाटील यांची  पाठराखण

मुंबई : महसूलमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ात एका पूरग्रस्ताला गप्प बसवल्यावरून झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांची पाठराखण केली. चंद्रकांतदादा यांनी त्या व्यक्तीस दरडावले नाही तर शांत केले, पण त्यावरून गैरसमज पसरल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील  कोल्हापूर जिल्ह्य़ात पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना एका युवकाने त्यांना प्रश्न केले असता पाटील यांनी त्यास गप्प बस असे दरडावल्याचे वृत्त पसरले. त्यावरून विरोधकांनीही पाटील यांच्यावर टीका केली होती.