26 February 2021

News Flash

टँकरमाफियांबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून विचारणा

आजवर काय कारवाई केली याबाबतचा जाब विचारण्यात आला आहे.

चौकशीच्या आदेशानंतर प्रशासनाला जाग

बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांना टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठाबाबत चौकशीचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रात रासायनिक टँकरमधून पाण्याचा बेकायदा पुरवठा केला जात असल्याची बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली होती. याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयातून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून कागदी घोडे नाचविण्याचे काम संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.

औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांचे वाढलेले प्रदूषण यामुळे या ठिकाणी कारखान्यांचे पाणीकपात करण्यात आली होती. यामुळे काही कारखान्यात प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन घेण्यासाठी बेकायदेशीर पणे टँकरने पाणीपुरवठा केल्याचे प्रकार उघडकीस आले होते. मात्र अशा टँकरमाफियांवर पोलीस प्रशासन व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ देखील कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करताना दिसत नव्हते. यामुळे टँकरमाफियांनी बेसुमारपणे रात्रीच्या वेळी रासायनिक कारखान्यांना पाणीपुरवठा करणे सुरू केले होते.

याबाबत वृत्त लोकसत्तामध्ये दि. २० फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व बोईसर पोलीस चांगलेच कामाला लागलेले दिसून आले. लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा विभागाला मुंबई कार्यालयातून देण्यात आले. यानुसार आजवर काय कारवाई केली याबाबतचा जाब विचारण्यात आला आहे.

औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कारखान्यांना टँकरने केला जाणारा पाणीपुरवठा याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने देखील दुजोरा दिला असून आजवर पोलिसांना व संबंधित विभागाला पत्र देऊन देखील फौजदारी कारवाई केली नसल्याचा खुलासा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. यावरून टँकर माफियांना असलेले पोलीस व इतर विभागाचे पाठबळ हे दिसून आले. यातच पालघर जिल्हाधिकारी यांनी दोन महिने अगोदरच औद्योगिक क्षेत्रात टँकर बंदी याबाबत आदेश काढले होते. यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करणे व औद्योगिक क्षेत्रात देखरेख करणे याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी यांची रात्री फक्त ११ वाजेपर्यंत देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु फक्त कागदोपत्री दिखावा करण्यासाठी हे कर्मचारी याठिकाणी उपस्थित राहत असल्याचे दिसून आले होते. त्यातच औद्योगिक क्षेत्रात रात्री उशिरा टँकरने पाणीपुरवठा होत असताना फक्त ११ वाजेपर्यंत देखरेख करून काय उपयोग असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तपासणीच्या वेळी सुरक्षा

मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या आदेशानंतर बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पत्र देऊन औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या टँकर पाणीपुरवठाबाबत आपण जेव्हा तपासणी करणार त्यावेळी दोन पोलीस नियुक्त करत असल्याचे सांगितले आहे. यावरून जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले, त्यावेळी पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केले असा प्रश्न उपस्थित होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:25 am

Web Title: chief minister office inquires about tanker mafia akp 94
Next Stories
1 भाडोत्री वाहन कंत्राटात अनियमितता
2 जयंत पाटील यांची खेळी यशस्वी
3 नवापूरमध्ये बर्ड फ्लूने नुकसान
Just Now!
X