भाजपाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच्या सरकारने सर्व काम केली असा दावा आम्ही कधीही केला नाही. पण, यापूर्वीच्या सरकारपेक्षा उत्तम कामगिरी आमच्या सरकारने केली आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाजनादेश यात्रेदरम्यान ते बीडमध्ये बोलत होते.

भाजपाची दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा बीड जिल्ह्यात आली आहे. बीड शहरात दाखल झालेल्या यात्रेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, पीक विम्यासारख्या लाभातून शेतकरी समृद्ध होणार नाही. त्यासाठी शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी मिळणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा दूर करण्यासाठी सरकारने वॉटर ग्रीड योजनेचे काम हाती घेतले आहे. तसेच कोकणातून समुद्रात जाणारे नद्यांचे पाणी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात आणले जाणार आहे. त्यादृष्टीने सरकारने काम सुरू केले आहे. तब्बल १६७ टीएमसी पाणी या योजनेच्या माध्यमातून आणले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी काम केले जात आहे. जिल्ह्यासाठी ४ हजार ८०० कोटी रूपयांची पाईपलाईन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर परळी वैद्यनाथ देवस्थानाच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून १३३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे कामही वेगात सुरू असून लवकरच या मार्गावरून रेल्वे धावताना दिसेल. स्त्रीभ्रुण हत्यांमुळे जिल्ह्यातील मुलींची संख्या घटली होती. पण राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने ही परिस्थिती सुधारली आहे. आमच्या सरकारने सर्व कामे केली आहे असा दावा आम्ही कधीही केला नाही. पण यापूर्वीच्या सरकारांपेक्षा जास्त कामे आम्ही केली आहेत, असे फडणवीस यावेळी म्हणाले.