करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपानं माझं अंगण रणांगण आंदोलन केलं होतं. त्याचबरोबर राज्य सरकारनं पॅकेजची घोषणा करण्याची मागणीही भाजपाकडून करण्यात आली होती. या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी प्रथमच भाष्य केलं. रविवारी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाचा नामोल्लेख टाळत समाचार घेतला आहे.

राज्यात करोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य आणि आर्थिक आघाडीवर डोकं वर काढलेल्या आव्हानाचा सामना सध्या राज्य करत आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपाकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर दिलं.

मुख्यमंत्री म्हणाले,”राज्यात होळीनंतर करोनाची बोंबाबोंब सुरू झाली. त्यानंतर सगळे सण उत्सव शांततेत साजरे केले गेले. या काळात मी नियमितपणे आपल्यासमोर येतोय. राज्यातील करोना परिस्थितीविषयी माहिती देतोय. राज्यात करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. यात काही ठिकाणी रुग्णांची आबाळ होतेय, हे सत्य आहे. मात्र, रुग्णांची संख्या फार मोठी आहे. आता आपल्याकडे फिल्ड हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी लक्षणं दिसल्यास तातडीनं तपासणी करून घ्यायला हवी. जेणेकरून वेळेत उपचार करता येऊ शकतात,” असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं.

“गेल्या काही दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. मे अखेरीपर्यंत राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड लाख होईल, अशी शक्यता केंद्रीय आरोग्य पथकानं व्यक्त केली होती. पण, आता राज्यात फक्त ३३ हजार रुग्ण आहेत. राज्यातील एकूण आकडा सध्या ४७ हजार आहे, मात्र यातील १३ हजार ४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

“राज्यातील परिस्थिती राजकारण करण्याची नाही. त्यामुळे माझ्याकडूनही राजकारण होणार नाही, पण नेत्यांनी राजकारण करू नये. पॅकेजची मागणी केली जात आहे. केंद्राकडून पॅकेज देण्यात आलं. पण ते पॅकेज उघडलं, तर त्यात काहीच नाही. तो फक्त रिकामा खोका निघाला. पॅकेज काय घोषित करायचं? जाहिरात करायची की मदत करायची. प्रत्यक्ष काम करायचं. पोकळं घोषणा करणारं आमचं सरकार नाही. पॅकेज घोषित कशाला करायचं? त्यापेक्षा सरकारनं प्रत्यक्ष मदत करण्याचं कामं केलं आहे. आतापर्यंत राज्यातून ४८१ ट्रेन सोडल्या आहेत. सहा ते सात लाख मजुरांची सोय केली आहे. राज्य ८० रेल्वेगाड्यांची मागणी करत आहे, पण आपल्याला ३० ते ४० गाड्या मिळत आहे. राज्यातील स्थिती राजकारणाची नाही, पण काहीजणांना परिस्थितीचं गांभीर्य कळालेलं नाही. मी कुणाविषयी बोलतोय, हे जनतेला कळालं असेल, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.