राज्यात साईबाबांच्या जन्मस्थळावरून नवा वाद उफाळून आला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी हे साईबाबांचं जन्मस्थान असल्याचं सांगण्यात आल्यानंतर या वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर याविरोधात शिर्डीमध्ये रविवारी बंद पाळण्यात आला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांची बैठक बोलावली असून, या बैठकीत वादावर काय तोडगा निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

परभणी जिल्ह्यातील पाथरी हे साईबाबांचं जन्मस्थान असल्याच्या तर्काला शिर्डीतील नागरिकांनी विरोध केला आहे. पाथरीची ओळख साईबाबांचं जन्मस्थान म्हणून नको अशी मागणी करत शिर्डी रविवारी बंद पाळण्यात आला. यामुळे हा विषय राज्यात चर्चेला आला. या बंददरम्यान देशभरातून आलेल्या भाविकांना समस्यांचा सामना करावा लागला. या बंदमधून आवश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. शिर्डी बंदनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलवू असं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शिर्डीतील बंद रविवारी रात्री मागे घेण्यात आला.

जन्मस्थान कोणतं शिर्डी की पाथरी?

पाथरी ही साईजन्मभूमी आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. ते वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी शिर्डीतील नागरिकांकडून केली जात आहे. दुसरीकडं पाथरीतील नागरिकही या मुद्यावर आक्रमक झालेले दिसून आले. त्यामुळे मुख्यमंत्री काय भूमिका घेणार, हे आज बैठकीत स्पष्ट होणार आहे. शिर्डी आणि पाथरीत निर्माण झालेल्या वादावर सामोपचारानं तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. यासंदर्भात सोमवारी २० जानेवारी रोजी मुंबईत बैठक होत असून, या बैठकीला शिर्डीतील ग्रामस्थ उपस्थित राहणार आहे. मात्र, पाथरीतील नागरिकांना बैठकीचं निमंत्रण दिलं नसल्याचं वृत्त आहे.