मंत्री गुलाबराव पाटील यांचे सूचक प्रतिपादन

राहाता : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, मी माझा पक्ष वाढवेन, मात्र दोघेही महाविकास आघाडीचे घटक असल्याने त्याचा विसर त्यांना पडू नये असे खोचक उद्गार शिवसेनेचे नेते व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिर्डीत काढले.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी  बुधवारी शिर्डी येथे साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले.  ते पुढे म्हणाले,की काही नसले तरी श्रेय घ्यायचे असते ना, बाळाला कोणी जन्म देवो, ते आमचेच आहे, ही म्हणण्याची जी मानसिकता आहे ती पूर्वीपासून आहे, हा श्रेय घेण्याचा विषय नसून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मुख्यमंत्र्यांची घोषणा असल्याने मुंबईसारख्या दाट लोकवस्तीत करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला असून ज्याप्रमाणे मंदिर उघडण्याचे श्रेय घेतायेत त्याचप्रमाणे करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणल्याचे

श्रेय  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावे.

सरकारने राज्यातील मंदिरे खुले करण्यासाठी जरी विलंब केला असेल तरी तो आपल्या सर्वांच्या हितासाठी होता. दरम्यान, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला राज्यातील नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.

साई संस्थान प्रशासनाने करोनाच्या पाश्र्वाभूमीवर मंदिरातील दर्शन व्यवस्था व यंत्रणा योग्य पद्धतीने केली असून जनतेने शिस्त पाळली तर पुढील धोका टळणार आहे, त्यामुळे शहरातील छोटे-मोठे व्यवसायिक यांचे व्यवसाय चालतील तसेच शहरातील आर्थिक उलाढाल सुरू होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.