शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फैलावर घेतलं होतं. उद्धव ठाकरेंनी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करत मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतवरही शरसंधान केलं होतं. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर कंगना रणौतनं प्रत्युत्तर दिलं आहे. कंगनाने उद्धव ठाकरेंना तुम्ही घराणेशाहीमधून आलेलं नेतृत्व असल्याचा टोला अप्रत्यक्षपणे लगावला आहे.

“मुख्यमंत्री, मी तुमच्याप्रमाणे माझ्या वडिलांच्या सत्तेवर आणि पैशावर मोठी झालेली नाही. मला जर घराणेशाहीचं प्रोडक्ट व्हायचं असतं तर मी हिमाचलमध्येच राहिली असते. मी एका प्रतिष्ठित कुटुंबातून येते. मात्र मला त्यांच्या मर्जीवर आणि संपत्तीवर राहण्याची इच्छा नव्हती. काही लोकांकडे स्वाभिमान आणि स्वत:ची संपत्ती असते,” असं ट्विट कंगनाने केलं आहे.

अन्य एका ट्विटमध्ये कंगनाने मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही जाईल, असं विधानही केलं आहे. “महाराष्ट्रातील सध्याचे मुख्यमंत्री देशाच्या विभाजनाचे काम करत आहेत. त्यांना महाराष्ट्राचं ठेकेदार कोणी बनवलं आहे. ते जतनेचे सेवक आहेत. त्यांच्या आधी दुसरं कोणीतरी होतं. त्यांच्यानंतर दुसरं कोणीतरी जनतेची सेवा करेल. ते महाराष्ट्राचे मालक असल्यासारखे का वागत आहेत?,” असं ट्विट कंगनाने केलं होतं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर मुंबई आणि महाराष्ट्रातील राजकारणात नव्या वादानं डोकं वर काढलं होतं. या प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतनं थेट राज्याचे पर्यटन मंत्री आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंचंही नाव घेत आरोप केले होते. त्याचबरोबर मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली होती. कंगनाकडून करण्यात आलेल्या आरोपांना उद्धव ठाकरे यांनी नामोल्लेख टाळत प्रत्युत्तर दिलं. “रामानं रावणाचा वध केला. आपणही प्रातिनिधीक स्वरूपात रावणाचा वध करतो. दहा तोंडांचा रावण. अनेक तोंड आहेत. हा रावण दहा तोंडांनी महाराष्ट्रावर आलेला आहे. रावणाचं एक तोंड म्हणतंय, मुंबई पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे. पाकव्याप्त काश्मीर? मला आठवत २०१४मध्ये मोदी म्हणाले होते की, पाकव्याप्त काश्मीर भारतात आणणार… पाकव्याप्त राहू द्या. भारताचा जो काश्मीर आहे तिकडे ज्यांना मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटते, त्यांना म्हणावं, अनधिकृत सोडून द्या. ३७० कलम काढलेलं आहे. अधिकृत १ इंच जमीन तरी तुम्ही आज घेऊन दाखवा आणि मग आमच्या अंगावर या. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं. वरती दाखवायचं की आम्ही कष्ट केलेले आहेत. मुंबई महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची, ही असली रावणी औलाद. महाराष्ट्रात जणू काही कायदा सुव्यवस्था अस्तित्वातच नाही. मुंबई पोलीस हे जणू काही निकम्मे आहेत. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे जे काही मध्ये सगळं झालं, जणू काही महाराष्ट्रात शिवाजी पार्क असेल इकडे तिकडे गांजाची शेतीच फुललेली आहे. असं हे चित्र म्हणजे मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे. महाराष्ट्र मुंबई पोलीस निकम्मे आहेत. ते काही काम करत नाहीयेत. इकडे सगळे नशिले आहेत. असं चित्र निर्माण करायचं. त्यांना माहिती नाहीये अजून महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्या संस्कृतीत आमच्या घराघरामध्ये तुळशीची वृंदावन आहेत, गांजाची नाही,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या अभिनेत्री कंगना रणौतचा समाचार घेतला.