News Flash

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज यांना फोन; म्हणाले, सहकार्य करा

राज्यातील लॉकडाउनबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे

संग्रहीत

राज्यात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण देखील वाढले आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कठोर करण्यात आलेले आहेत, शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा देखील इशारा दिलेला आहे. मात्र, लॉकडाउनला विरोधी पक्ष भाजपासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील विरोध दर्शवलेला आहे. याशिवाय, सत्ताधारी पक्षात देखील याबाबत एकमत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ लागल्याने, काहीतरी ठोस निर्णय घेण्याच्या उद्देशाने आज मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवर संपर्क साधून सहकार्य करावे, असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. “राज्यातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाउनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोनवरील संवादात केलं आहे.” असं ट्विट मनसेकडून करण्यात आलेलं आहे.

लॉकडाउनचे दिले होते संकेत

शुक्रवारी जनतेशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी दोन सत्रांत उद्योजकांसह प्रसारमाध्यमे, व्यायामशाळा चालक, मराठी नाट्य निर्माता संघ तसेच त्यानंतर राज्यातील मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृह चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी स्वयंशिस्त पाळली असती, तर आजची स्थिती आली नसती. लसीकरणातही आपण सर्वात पुढे आहोत. नुकसान तर पूर्ण राज्याचे होणार आहे. ‘जिंदगी, जान उसके बाद काम,’ याप्रमाणे पुढे जावे लागेल. त्यासाठी आता काही पावले उचलावीच लागतील. परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावे लागतील. लोकांमध्ये करोनाविषयी जागरूकता निर्माण करावी लागेल. भीती गेली हे चांगले झाले. पण त्यामुळे बेफिकिरी वाढली आहे. या विषाणूचा संसर्ग धोकादायक हे सांगण्याची वेळ आली आहे, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनबद्दलचे संकेत दिले होते. तसेच सरकारच्या निर्णयाला सहकार्य करण्याची विनंती सर्व क्षेत्रातील प्रतिनिधींना केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 4:00 pm

Web Title: chief minister uddhav thackeray phone calls raj thackeray said cooperate msr 87
Next Stories
1 राज्यात करोना रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटर खाटांचे प्रमाण ढासळते!
2 .. यामुळे मुंबईतील आर्थिक घडामोडी नक्कीच थांबतील – संजय निरूपम
3 केंद्रीयमंत्री गडकरींकडून महाराष्ट्रातील महामार्गांसाठी भरघोस निधी जाहीर
Just Now!
X