मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’च्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे संपादक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली. सामनात झालेल्या पद बदलावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी विधान भवनात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राज्य सरकारकडून आणण्यात आलेल्या आणि नियोजित योजनांबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर अयोध्या दौरा आणि शेतकरी कर्जमाफीसह विविध विषयावर भूमिका मांडली. पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच उद्धव ठाकरे यांनी सामनामध्ये झालेल्या बदलावर भाष्य केलं.

आणखी वाचा- आई संपादक झाली…आदित्य ठाकरे म्हणतात…

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “सामनाच्या संपादक पदाची जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्याकडून रश्मी ठाकरे यांच्याकडं देण्यात आली आहे. मात्र, संपादकीय विभागाची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेच आहे. संपादक बदलल्यानंतर सामनाची भाषा आणि दिशा बदलेल असं बोललं जात आहे. पण, सामनाची भाषा आहे तशीच राहिल. सामनाची भाषा ही पितृभाषा आहे. बाळासाहेबांकडून आलेली आहे. त्यामुळे सामनाची भाषा आणि दिशा कधीच बदलणार नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा- मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अद्याप माझ्यासमोर आलेला नाही : उद्धव ठाकरे

सामना आणि शिवसेना

सामनामधून शिवसेनेची राजकीय भूमिका, विचार प्रखरपणे मांडले जातात. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. सामनामध्ये लिहिले जाणारे अग्रलेख देशभरात चर्चेचा विषय असतात.  ९०च्या दशकात आपली राजकीय भूमिका, विचार महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या दैनिकाची सुरुवात केली. २३ जानेवारी, १९८९ रोजी मध्यरात्री ‘सामना’ दैनिकाची सुरुवात झाली. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, मोठ्या थाटामाटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले.