विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचा एकमेकांशी संवाद नसून, केवळ स्थगिती देण्याचं काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,”महाविकास आघाडी सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं काम सुरू केलं आहे. हे विरोधकांनी हे डोळे उघडे ठेवून बघावं, त्यांचं वय ६ ते १८ वर्ष असतं तर त्यांनाही चष्मे दिले असते,” असा टोला ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला.

राज्याचे अर्थ संकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारविषयी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरं दिली. मुख्यमंत्री म्हणाले,”विरोधी पक्षानं त्यांची भूमिका नीट वटवायला हवी. सरकार काही करत नाही, ही भूमिका चुकीची आहे. त्यांच्या काही व्यथा असतील, त्यांनी सरकारला सांगाव्यात. केवळ विरोधक आहोत म्हणून वारेमाप आरोप करणं चुकीचं आहे, असा सल्ला मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीसांना दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकार स्थिर झालं आहे. कामं करत आहे. हे सरकार काम करत आहे, हेच विरोधकांना पचन होत नाही. त्यांना पचत नसलं तरी आमची बांधिलकी जनतेशी आहे. महाविकास आघाडी सरकारनं केलेल्या घोषणा आणि त्यांची वचनपूर्ती याची पुस्तिका तयार करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात चांगले निर्णय घेतले आहेत. सर्व घटकातील जनतेला आधार देण्याच काम केलं आहे. सगळे विषय एका फटक्यात सोडवता येणार नाही. अचाट वाटावं म्हणून सुरू करायचं आणि पेलवंत नाही म्हणून उताणं पडायचं हे आमच्या सरकारला जमत नाही. नुसत्या घोषणा नाही, तर हे सरकार कामही करत आहे,” असंही ठाकरे यावेळी म्हणाले.