भाजपाचे ज्येष्ठ नेते नाथाभाऊ अर्थात एकनाथ खडसे राज्यातील सत्तास्थापनेनंतर चर्चेच्या वर्तुळात आहेत. राज्यातील पक्ष नेतृत्वावर शरसंधान साधत खडसे यांनी ओबीसी नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे नाराज असलेले खडसे पक्षाला धक्का देतात की काय अशी चर्चा सुरू आहे. त्यात खडसे हे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्याला ठाकरे यांनीही दुजोरा दिला आहे.

मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यामुळे नाराज असलेले एकनाथ खडसे विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्यानंतर आक्रमक झाले. त्यात मुलगी रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. त्याचबरोबर परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. या दोन्ही पराभवावरून एकनाथ खडसे यांनी पक्ष नेतृत्वावरच निशाणा साधला. पक्षातील नेत्यांमुळेच हे पराभव झाले असून, ओबीसी नेतृत्व डावलण्याचं काम पक्षाकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

आणखी वाचा- ‘शिवसेनेसोबत पुन्हा युती शक्य आहे का?’; फडणवीस यांचे सूचक उत्तर, म्हणाले…

दुसरीकडे १२ डिसेंबरला होत असलेल्या गोपीनाथ गडावरील मेळाव्यात पुढील दिशा ठरवणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्यावरून खडसे आणि मुंडे यांच्या मनात नेमकं चाललं काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यात दिल्लीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी गेलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन परतले. त्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचं खडसे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या भेटीला दूजोरा दिला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “नाथाभाऊ (एकनाथ खडसे) आमचे जुने सहकारी आहेत. त्यांच्या राजकारणापलीकडे संबंध आहेत. त्यामुळे आपण खडसे यांना भेटणार आहोत,” असं ठाकरे यांनी सांगितलं. मात्र, या भेटीत कशावर चर्चा होणार याविषयी बोलणं टाळलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसे अचानक मुख्यमंत्र्यांची भेट कशासाठी घेत आहेत. हे कोडं तुर्तास तरी गुलदस्त्यात आहे.