मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमध्ये दाखल झाले. चिपळूण व खेडमध्ये पुराचं पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री चिपळूणमधील बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा तेथील एका महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत काही करा पण आम्हाला उभं करा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी देखील या महिलेचं म्हणणं ऐकून घेत, तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची देखील उपस्थिती होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली, व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक दुकानदारांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही या व्यापाऱ्यांना आणि स्थानिकांचं सांत्वन केलं. मुख्यमंत्री येणार म्हणून या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती.

मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं. सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं.

तर, “तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, ते आमच्यावर सोडा”, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना दिलासा दिला.

नागरिकांच्या भावाना जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज चिपळूण बाजारपेठेत दाखल झाले तेव्हा, काही नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर देखील दिसून आला. काही नागरिकांनी तर मुख्यमंत्र्यांसमोरच ठिय्या दिला होता. शेतकऱ्यांप्रमाणे व्यापाऱ्यांना देखील कर्जमाफी द्या, अशी देखील यावेळी काही स्थानिक व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यानंतर मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीसाठी पुढे रवाना झाले.

चिपळूणमध्ये दरड कोसळून घर जमीनदोस्त, दोन वर्षांचा मुलगा बेपत्ता: शोध सुरु

रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली आहे. रत्नागिरीत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला असून १७ जण बेपत्ता आहे. दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे कुंभारवाडीचाही समावेश आहे. पेढे कुंभारवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत घर जमीनदोस्त झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे.