मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. आता सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यावेळी ते पूरग्रस्त पीडितांशी संवाद साधणार आहेत. सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. हजारो कुटुंबांना फटका बसला असून घरासह व्यवसायाचं नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून पिकेही वाया गेली आहेत. काही ठिकाणी जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ात गेल्या आठवडय़ात पावसाने धुमाकूळ घातला होता. पश्चिम घाटासह या जिल्ह्य़ात झालेल्या अतिवष्टीमुळे कृष्णा, वारणा, पंचगंगेसह सर्वच नद्यांना महापूर आले होते. या पुराचे पाणी सांगली आणि कोल्हापूर शहरासह नदीकाठच्या अनेक गावांमध्ये शिरले होते.

पूरग्रस्त घरी पोचले तरी राज्य शासनाची मदत त्यांच्यापर्यंत पोचली नाही. पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यास आम्ही सरकारला भाग पाडू, असा दिलासा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दिला होता.