मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या सोमवारी १९ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रत्यक्ष पूरपरिस्थितीची पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थांची चर्चा करणार आहेत.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्याला हाती आलेले पीक गमवावं लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्याच्या बाधावर जाऊन परिस्थिती जाणून घेणार आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडत नसल्याने त्यांच्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत होती.

“घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच करोना होतो का?”

घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच करोना होतो का असा सवाल भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विचारला आहे. “राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे,” असं त्यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आमच्या काळात मोबाईल नेहमी व्हायब्रेट करायचा. काही तरी मदतीचा एसएमएस यायचा असं म्हणत राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

“देवेंद्र फडणवीस राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, पण ते किती जिल्ह्यात गेले आणि आताचे मुख्यमंत्री किती ठिकाणी जाऊन आले. मला सांगू नका तुम्हीच विचार करा आणि आपापल्या गावात जाऊन सांगा. मी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, ग्रामीण, शहर सगळीकडे फिरलो. मुख्यमंत्री महोदय आम्ही म्हणतो घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी. एकट्यालाच खातो की काय कोरोना?,” अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.