चिक्की खरेदी प्रकरणातील गैरव्यवहारावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कारभारावर गुरुवारी घणाघाती टीका केली. चिक्की, आयुर्वेदिक बिस्किटे, वॉटर प्युरिफायर, चटया, ताटे यांच्या खरेदीमध्ये मोठा गैरकारभार असून, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करीत धनंजय मुंडे यांनी या घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेत केली. अंगणवाड्यांकडून चिक्की, बिस्किटे, चटया यांची कोणतीही मागणी आलेली नसताना या वस्तू खरेदी करण्याची कंत्राटे का देण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या घोटाळ्यामुळे सरकारने लोकांचा विश्वास गमावला असल्याची टीका त्यांनी केली.
कागदपत्रे आणि जुन्या निर्णयांचा दाखला देत धनंजय मुंडे यांनी एकेक मुद्दा मांडत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली घेण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयांचा पाढाच वाचला. ते म्हणाले, चिक्की खरेदीसाठी केंद्र सरकारकडून पैसे आले होते. ते खर्च केले नसते, तर परत गेले असते, हा राज्य सरकारकडून करण्यात आलेला बचाव फसवा आहे. हे पैसे डिसेंबरमध्ये आले होते. मात्र, ते मे मध्ये खर्च करण्यात आले. आयुर्वेदिक बिस्किटे खरेदी करण्याचा मूळचा प्रस्ताव ९५ लाखांचा होता. मात्र, तो रद्द करून पाच कोटींची खरेदी करण्यात आली. त्याचबरोबर ही बिस्किटे खरेदी करण्यासाठी ज्या ‘गोवर्धन आयुर फार्मा’ला कंत्राट देण्यात आले. त्यांच्याकडे ही बिस्किटे बनवण्याचा परवानाच नाही, याकडे धनंजय मुंडे यांनी लक्ष वेधले.
चिक्कीमध्ये आळ्या असल्याचे प्रकरण नगर जिल्ह्यातील पारनेरमधील शिवसेनेच्या नेत्याने बाहेर काढले. मात्र, यासंदर्भात माझ्यावर विनाकारण आरोप करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, या सरकारने पाण्यातही भ्रष्टाचार केला आहे. वॉटर प्युरिफायर खरेदी करण्याचे कंत्राट दरकराराआधीच देण्यात आले. आयुक्तांनी ४५०० रुपये किमतीचा वॉटर प्युरिफायर खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला असताना, प्रत्यक्षात ५२०० रुपये किमतीचा वॉटर प्युरिफायर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. किंमत वाढवून का खरेदी करण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील अंगणवाड्यांची खोली दहा बाय दहाची असताना, दहा बाय चौदा या आकाराच्या चटया खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सध्या सर्व ठिकाणी चटया पडून आहेत, असाही आरोप धनंजय मुंडे यांनी केला. ज्या संस्था स्वतः उत्पादन करतात, त्यांनाच दरकरार पद्धतीने कंत्राट देता येते. मात्र, स्टील ताटांच्या खरेदीमध्ये उत्पादन न करणाऱया संस्थेला कंत्राट दिल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले.
गरिबांच्या मुलांचे अन्न खाण्याची माझी संस्कृती नाही – पंकजा मुंडे
गरिबांच्या मुलांचे अन्न खाण्याची माझी संस्कृती नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप विधान परिषदेत फेटाळून लावले. राज्यात ज्या ठिकाणी चिक्कीबद्दल तक्रारी आल्या आहेत. तिथे चिक्की वाटप थांबविण्यात आले आहे आणि याची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्याचबरोबर नियमांच्या आधारेच महिला व बालविकास खात्याने सर्व खरेदी केली असल्याचे त्यांनी सांगितले. याआधीच्या महिला व बालविकास विभागाने १४०२ कोटी रुपयांची खरेदी दरकरार पद्धतीने केली होती. त्यावेळी हेच आक्षेप का घेण्यात आले नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.