दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सोनपेठ तालुक्यातील दौऱ्यात त्यांच्या चपलेचे कवित्व गाजले. मुंडे यांची चप्पल गाळात फसल्याने एका कार्यकर्त्यांने ती धुवून पुन्हा त्यांच्यासमोर आणून ठेवली. तोवर चपलेशिवाय मुंडे यांना काही पावले चालावे लागले. मात्र, ही चप्पल त्यांच्यासमोर आणणारी व्यक्ती अधिकारी की त्यांचा कार्यकर्ता, असा खल काल दिवसभर चालू होता. जिल्ह्याच्या दुष्काळाची दाहकता भीषण असताना हे चप्पल पुराण चच्रेत राहिले.
सोनपेठ तालुक्यातील निळा येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधलेल्या बंधाऱ्याचे जलपूजन मुंडे यांच्या हस्ते झाले. माजी आमदार गोिवद केंद्रे, वैजनाथ सोळंके, रंगनाथ सोळंके, सरपंच विष्णू आढाव आदी या वेळी उपस्थित होते. निळा येथे बंधाऱ्यावर जलपूजनास जात असताना मुंडे यांची चप्पल फसली. ही चप्पल त्यांनी तेथेच सोडून दिली व काही पावले अनवाणी बंधाऱ्याकडे चालत गेल्या.
जलपूजन करून परतल्यानंतर एका कार्यकर्त्यांने ही चप्पल त्यांना स्वच्छ धुवून आणून दिली. शिवारात चिखल असल्याने चप्पल तेथेच सोडून त्या पुढे गेल्या. सोबत असलेल्या कर्मचाऱ्याला हातांनी चप्पल मुंडे यांच्या पायाशी ठेवण्याची वेळ आली. त्यानंतर चप्पल देणारी व्यक्ती कोणी अधिकारी वा कर्मचारी असल्याचे वृत्त ‘व्हॉट्सअप’वरून पसरले. काही वाहिन्यांनीही हे वृत्त दिले. त्यानंतर ही चप्पल आणून देणारी व्यक्ती आपली खासगी कर्मचारी होती, असा खुलासा मुंडे यांनी केला. ‘माझी चप्पल गाळात अडकली होती आणि माझ्या माणसाने ती उचलून दिली,’ असे त्यांनी म्हटले.
दुष्काळी दौऱ्यात मुंडे यांची चप्पल उचलल्यानंतर त्यांच्या शाही थाटाची चर्चा या निमित्ताने सुरू झाली. चप्पल उचलणारी व्यक्ती सरकारी कर्मचारी नसली, तरीही मंत्र्यांना चप्पल उचलून देण्यास माणसे लागतात, अशी टीका पुन्हा या निमित्ताने सुरू झाली आहे. ‘चिक्की’ प्रकरणावरून मुंडे आधीच चच्रेत आहेत. आता ‘चप्पल’ प्रकरणावरून त्या पुन्हा चच्रेत आल्या आहेत.