पूरक व्यवसायावर परिणाम; डहाणूतील संकलन केंद्रात शुकशुकाट

डहाणू : लांबलेला पावसाळा, वातावरणातील बदल यांमुळे चिकू फळांचे उत्पादन १० टक्क्यांवर आले आहे. उत्पादन घटल्याने चिकूवर अवलंबून असलेल्या पूरक व्यवसायावरही परिणाम झाला आहे. डहाणूमध्ये असलेल्या तीनही चिकू संकलन केंद्रात सध्या शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळत आहे.

चिकूचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या डहाणू, घोलवडच्या चिकू उत्पादनाला यंदा बदलते हवामान, परतीचा पाऊस, चक्रीवादळ, बुरशीजन्य रोगाचा मोठा फटका बसला आहे. चिकू फळ झाडावर परिपक्व होण्यासाठी आठ ते साडेआठ महिन्यांचा कालावधी लागतो. गेल्या वर्षभरात प्रतिकूल वातावरणामुळे आणि प्रदूषणामुळे बागायतीतील उत्पादन घटले आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत थंडीच्या हंगामात झाडावरील चिकू फळे पिकण्याचे प्रमाण जास्त असते. मात्र सध्या झाडावर खूपच कमी फळे लागल्याचे दिसून येत आहे. सध्या चिकूचे उत्पादन १० टक्क्यांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे बागायत आणि शेतीचे व्यवस्थापन कोलमडले आहे. पूरक व्यवसाय म्हणून विकसित होणाऱ्या फळ प्रक्रिया उद्य्ोगावरही याचे परिणाम होत आहेत.

डहाणू तालुक्यातील महिला बचतगटांतर्फे तसेच काही उद्योजक महिलांतर्फे चिकूपासून तयार केल्या जाणाऱ्या चिप्स, पावडर, लोणचे, सुपारी, चॉकलेट, बफीं, मिठाई अशा पदार्थाना खूप मागणी असते. मात्र चिकूचे उत्पादन खूपच कमी झाल्याने या पूरक व्यवसायांवरही परिणाम झाला आहे. चिकू काढणे, संकलन करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे ही कामे करणाऱ्या हजारो मजुरांचा रोजगार बुडाला आहे.

डहाणू तालुक्यात बोर्डी, घोलवड, चिंचणी, कोसबाड, कैनाड, सरावली, झारली, आसनगाव, वाणगाव, सावटा, जांभुगाव, आसवे येथील प्रसिद्ध चिकू बागायतदारांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. डहाणूमध्ये चिकू फळाचे संकलन करण्यासाठी तीन संकलन केंद्रे आहेत, मात्र तिथेही कमी फळे आली असल्याचे पाहायला मिळत आहे.

बचतगटांमार्फत चिकू चिप्स, पावडर, लोणचे असे विविध प्रकारचे पदार्थ आम्ही तयार करतो. याला चांगली मागणी असते. त्यातून चांगले उत्पन्न मिळते. मात्र यंदा चिकूचे उत्पादन घटल्याने याचा फटका प्रक्रिया उद्योगांना बसला आहे.

– लतिका पाटील, उद्योजक