नीरज राऊत

जव्हार आणि मोखाडा यांसारख्या दुर्गम आणि आदिवासी भागातील कुपोषित मुलांना सुदृढ बनवण्यासाठी बालसंजीवन छावणीची उभारणी करण्यात आली आहे. या छावणीत कुपोषित बालकांच्या राहण्याची, सकस आहाराची आणि उपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. या छावणीत एकाच वेळी १०० कुपोषित बालकांना आणि त्यांच्या पालकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील महिलांना आरोग्यविषयक प्रशिक्षण देण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्य़ात कुपोषणाची समस्या भेडसावत असताना शासनाने बालग्राम विकास केंद्र बंद केली होती. त्यामुळे श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्रमजीवी संघटना यांच्या माध्यमातून जव्हारजवळ एका भाडय़ाच्या जागेमध्ये कुपोषित बालकांच्या उपचारार्थ बालसंजीवन छावणीद्वारे एक अभिनव उपचार केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्राला मिळालेल्या प्रतिसादानंतर तसेच येथे दाखल झालेल्या बालकांच्या आरोग्यामध्ये झालेल्या झपाटय़ाने सुधारणेकडे पाहून या केंद्राला कायमस्वरूपी व्यवस्था देण्याचा निर्णय श्रमजीवी संघटनेने घेतला.

जव्हार परिसरात एक एकर जागेवर बालसंजीवन छावणी उभारण्यात आली असून यामध्ये एकावेळी १०० कुपोषित बालकांना त्यांच्या माता व भावंडांसोबत एकत्रितपणे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे एक कोटी ७५ लाख रुपयांच्या या प्रकल्पासाठी खासदार निधीमधून राजेंद्र गावित यांनी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून मुंबई- पुणे येथील अनेक सेवाभावी संस्थांनी या प्रकल्पासाठी आपले योगदान दिले आहे.

उद्या उद्घाटन

जव्हारजवळील सेल्वास रोड येथे उभारलेल्या या छावणीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार, २६ जुलै रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण,

खासदार राजेंद्र गावित, आमदार विष्णू सवरा, रवींद्र फाटक, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त संजय मिणा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

घरगुती वातावरण

*  कुपोषित बालकांवर रुग्णालयात उपचार करताना त्यांचा त्याठिकाणी मिळणारा प्रतिसाद पाहता अशा बालकांना त्यांच्या घराप्रमाणे असलेल्या वातावरणात सुदृढ करण्याची योजना आखण्यात आली आहे.

*  या बालसंजीवन छावणीमध्ये कुपोषित बालकांना रुग्णालयातील खाटांऐवजी घरगुती पद्धतीने जमिनीवर बिछाने अंथरून राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

*  त्यांना स्थानिक आदिवासी पद्धतीचाच पण पौष्टिक व सकस आहार देण्यात येणार आहे.

*  या केंद्रामध्ये दाखल केलेल्या कुपोषित बालकांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रशिक्षित परिचारिका उपलब्ध राहणार असून स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत आवश्यकतेनुसार घेण्यात येणार आहे.

*  या केंद्राला मुंबई व पुणे येथील बालरोगतज्ज्ञ वेळोवेळी भेट देणार आहेत.

*  दाखल झालेले कुपोषित पालक सुदृढ होईपर्यंत तसेच त्यांच्या कुटुंबीयांची या केंद्रात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कुपोषणमुक्तीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ही छावणी लोकांच्या सहभागातून कुपोषित बालकांना पोटभर अन्न मिळण्यासाठी प्रयत्न करणारे केंद्र असल्याने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांनी आणि संस्थांनी मोहिमेत सहभाग घ्यावा. हे केंद्र काही वर्षांनी बंद होणे अपेक्षित असून त्याचे रूपांतर नंतर रोजगार व वेगवेगळ्या स्वरूपांचे प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात येईल.

– विवेक पंडित, संस्थापक, श्रमजीवी संघटना