पाण्यात बुडून मरण पावलेल्या बालकाचा मृतदेह शवविच्छेदनापूर्वीच शवागारात उंदरांनी कुरतडल्याची धक्कादायी घटना उजेडात आला. या प्रकारानंतर आरोग्य विभागास गावकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. दरम्यान, या घटनेची चौकशी करण्याचे आदेश आज (१३ जून) दुपारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले आहेत. समुद्रपूर तालुक्यातील रेणुकापूर गावातील बालकाचा शुक्रवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला होता.

रेणुकापूर येथील शेतकरी राजू निखाडे यांचा अडीच वर्षाचा मुलगा प्रथमेश हा अंगणात खेळत होता. खेळता खेळता तोल जाऊन तो जवळच्या पाण्याच्या टाकीत कोसळला. ही बाब त्याच्या सत वर्षीय बहिणीच्या लक्षात आल्यावर तिने प्रथमेशला टाकीतून बाहेर काढले. कुटुंबीयांनी लगेच त्याला ग्रामीण रूग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी बालकास मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मृतदेहाची मागणी केल्यावर डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्याशिवाय देता येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे शुक्रवारी रात्रभर मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला होता. आज (१३ जून) सकाळी शवविच्छेदन करण्यासाठी बाहेर काढण्यात आल्यावर या मृतदेहास उंदरांनी कुरतडल्याचे दिसून आले. ही बाब कळताच कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर तहसिलदार राजू रणवीर व पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. तहसिलदारांनी चौकशी करीत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वाासन दिल्यावरच गावकऱ्यांनी शवविच्छेदन करण्यासाठी परवानगी दिली.

चौकशी करण्याचे आदेश, अहवाल आल्यावर कारवाई

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी हे म्हणाले की, “नेमका प्रकार तपासून घेत आहे. त्यासाठी उद्या (१४ जून) अतिरिक्त जिल्हा चिकित्सकांना समुद्रपूरला पाठविण्यात येत आहे. अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल, असे डॉ. मडावी यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.