News Flash

नगरमध्ये अडीच हजारांपेक्षा अधिक संकटग्रस्त बालकांचा शोध

‘चाईल्ड लाईन’चा रात्रीची गस्त उपक्रम

(संग्रहित छायाचित्र)

मोहनीराज लहाडे

लहान मुलांची काळजी व संरक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या ‘चाईल्ड लाईन’ या संघटनेच्या कार्यकत्र्यांनी नगर शहरात गेल्या १५ वर्षापासून सातत्याने, कोणताही खंड न पडू देता एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे.  या संस्थेने गेल्या १५ वर्षात तब्बल १४ हजार ७४१ बालकांचा (पैकी ८२१७ मुली) शोध घेऊन त्यांना मदतीचा हात दिला. यातील २ हजार ७७७ बालकांचा (पैकी १४०७ मुली) शोध केवळ ‘रात्रीची गस्त’ उपक्रमातून लागलेला आहे.

‘चाईल्ड लाईन’ने निर्माण केलेली व्यापक संपर्क यंत्रणा व या यंत्रणेतील स्वयंसेवकांचे मोठे जाळे शहरात आहे. या संपर्क जाळ्यात अगदी सर्वसामान्य म्हणजे पानटपरी चालक, रिक्षाचालक, व्यापारी संकुलातील सुरक्षारक्षक, शरीर विक्रय करणाऱ्या महिला अशांचाही समावेश आहे. त्यातून लहान बालकांविषयी सतर्कता निर्माण होण्यास मदतच झाली आहे. हरवलेली, भरकटलेली बालके दिसताच  ‘चाईल्ड लाईन’कडे संपर्क होतो आणि अवघ्या वीस मिनिटात संघटनेचे कार्यकर्ते तेथे पोहचलेले असतात.

यापूर्वी १९९८ मध्ये स्नेहालय संस्थेच्या कार्यकत्र्यांनी महिला व मुलांसाठी अशीच ‘मुक्तीवाहिनी’ यंत्रणा उभी केली होती.  स्नेहालय व ‘चाईल्ड लाईन’ फाऊंडेशनच्या संयोगातून मुक्तीवाहिनीतील मंजिरी तांबे, हनीफ शेख, प्रवीण मुत्याल, यशवंत कुरापटी, अंबादास चव्हाण, अनिल गावडे, दीपक बुरम या ‘टीम’ने  ‘चाईल्ड लाईन’चे काम सन २००३ पासून सुरू केले. हे पथक शहरातील झोपडपट्ट्या, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी विशेष लक्ष ठेवून, मदतीची आवश्यकता असणाऱ्या बालकांचा शोध घेत असत. सन २००५ च्या दरम्यान हनीफ शेख व ‘टीम’ला शहरातील तिसऱ्या बसस्थानकावर बारा वर्षाची मुलगी आईसमवेत पडली असल्याची माहिती मिळाली. या मुलीला प्रचंड रक्तस्रााव सुरू होता. पथकाने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेव्हा तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले. या घटनेने पथकाला रात्रीच्या गस्तीची आवश्यकता किती महत्त्वाची आहे, याची जाणीव करून दिली. त्यातूनच पथकातील कार्यकर्ते रोज रात्री ११ ते मध्यरात्री दोन-अडीचपर्यंत शहरातील बस स्थानके, रेल्वेस्थानक, मंदिरे, झोपडपट्ट्या, पोलिस ठाणे या ठिकाणी भेट देऊ लागले. दिवसा तर भेटी होत्याच परंतु रात्रीही सुरू करण्यात आल्या. टाळेबंदीतही या भेटी सुरूच आहेत. गस्तीचे रोजचे अंतर किमान २५ ते ३० किमी असते.

संकटात सापडलेल्या बालकाशी संवाद कसा साधावा, समुपदेशन कसे करावे, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क-संवाद कसा साधावा याचे प्रशिक्षण कार्यकत्र्यांना देण्यात आले आहे. संपर्क यंत्रणेसाठी  ‘चाईल्ड लाईन’ने शहरात २५० स्वयंसेवकांचे जाळे निर्माण केले आहे शिवाय बालकांच्या समस्या बालकच ओळखू शकतात, सांगू शकतात, हे लक्षात घेऊन प्रत्येकी ११ सदस्यांच्या बालमित्रांचा (वयोगट १४ ते १८) पंधरा गट निर्माण केले आहेत. शहराच्या विविध भागातून दरमहा बालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रबोधनासाठी ‘खुला मंच’ नावाचा उपक्रमही आयोजित केला जातो. यातून बालकांच्या समस्येला वाचा फोडली जाते. चाईल्ड लाईनचे कामही लोकांपर्यंत पोहोचते.

रात्रीची गस्त उपक्रमाकडे सुरुवातीच्या काळात बहुतांशी सरकारी यंत्रणांनी ‘नसते उद्योग’ म्हणून संभावना केली होती. पोलीस, जिल्हा सरकारी रुग्णालय, बाल कल्याण समिती, बाल संरक्षण अधिकारी अशा सर्वांचीच मानसिकता बदलण्याचे आव्हान ‘चाईल्ड लाईन’ला पेलावे लागले. ते त्यांनी यशस्वीरीत्या पेललेही. या यंत्रणांमध्ये बदल घडवत समस्याग्रस्त बालकांकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहण्यास भाग पाडले. आता समस्याग्रस्त बालक जर कुठे आढळले तर पहिला फोन पोलिसांना नव्हे तर  ‘चाईल्ड लाईन’ला जातो.  ‘चाईल्ड लाईन’च्या या कामातूनच स्नेहालयचे बालभवन, स्नेहांकुर, अनामप्रेम, स्नेहाधार आदी प्रकल्पांना चालना मिळाली.

सापडलेल्या संकटग्रस्त बालकांना धीर देणे, त्याच्याशी संवाद साधत अडचणींचा शोध घेणे, ती लक्षात आल्यावर त्याला सर्व प्रकारचीमदत देणे. सर्वप्रथम त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन बालकास त्यांच्या किंवा जवळच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करणे. बाल न्याय समितीच्या माध्यमातून बालगृहात ठेवून त्याच्या शिक्षणास, पायावर उभे करण्यास मदत करणे अशा दीर्घ पाठपुरावा करणाऱ्या प्रक्रियेत   कार्यकर्ते  सहभागी असतात.

बालकांची वर्गवारी

बेघर ३३३, वैद्यकीय मदत ४४, भावनिक आधार ३४६, शोषणापासून संरक्षण ३२८, बेपत्ता १८७, बालविवाह ४०, हरवलेले ८०२, घरातून वारंवार पळालेले २८७, आर्थिक मदत २६, पुनर्वसन ५१, मृत्यू ७, भीक मागणे १७०, विधीग्रस्त ११, अठरा वर्षापुढील ६२ व बालकामगार ३७, यापैकी कोणत्याही वर्गीकरणात नसलेले ४६ बालके.

चाईल्ड लाईनच्या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने काम करणारे, प्रश्न येण्याची वाट पाहण्याऐवजी प्रश्नांपर्यंत स्वत:हून जाणाऱ्या, पोहोचणाऱ्या कार्यकत्र्यांची आवश्यकता आहे. येथील कार्यकर्ते धडाडीने काम करत आहेत. त्यासाठी त्यांनी मोठे नेटवर्क निर्माण केले आहे. एकटी संस्था, संघटना काही करू शकत नाही. त्यासाठी त्यांना इतर स्वयंसेवी संस्था, सरकारी यंत्रणेच्या मदतीची आवश्यकता असते. चाईल्ड लाईनने ही माळ योग्य पद्धतीने गुंफली आहे. बालकांच्या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले तर पुढील गंभीर प्रकार टाळता येऊ शकतात अशा अनेक घटना चाईल्ड लाईनला काम करताना अनुभवास मिळाल्या. महाराष्ट्रात चाईल्ड लाईन यंत्रणा केवळ नगरमध्येच रात्रीची गस्त उपक्रम राबवते. इतर ठिकाणी चाईल्ड लाईनचे कार्यकर्ते स्वत: तक्रार देण्याचे किंवा साक्षीदार होण्याचे टाळतात, मात्र नगरमध्ये त्यासाठी प्रशिक्षण दिले गेले आहे. बाल लैंगिक शोषणाच्या दोन गुन्ह््यांमध्ये आरोपींना जन्मठेप देण्यापर्यंत चाइल्ड लाइनने पाठपुरावा केला.

-डॉ. गिरीश कुलकर्णी, संस्थापक, स्नेहालय, नगर.

चाईल्ड लाईनच्या रात्रीच्या गस्त उपक्रमामुळे मानवी तस्करीला मोठा आळा बसला आहे. संघटनेने सर्व स्वयंसेवकांना ओळखपत्र दिले आहे. लहान मुले पोलिसांपुढे बोलायला, माहिती द्यायला घाबरतात. अशावेळी चाईल्ड लाईन कार्यकत्र्यांचा मोठा उपयोग होतो. चाईल्ड लाईनच्या आग्रहामुळेच जिल्ह््यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये विशेष बाल पोलीस पथक निर्माण झाले आहे. सध्याच्या पथकात सर्वजण तरुण व उत्साही आहेत. करोना टाळेबंदीच्या काळात समस्याग्रस्त बालके आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. आई-वडील अल्पवयातच विवाह करण्याचा प्रयत्नात आहेत, परंतु मला शिकायचे आहे, म्हणून घराबाहेर पडणाऱ्या मुलींचे प्रमाणही वाढताना दिसते.

-हनीफ शेख, अध्यक्ष, बाल कल्याण समिती, नगर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:22 am

Web Title: child line night patrols at ahmednagar abn 97
Next Stories
1 वैतरणा पूल वाहतुकीस धोकादायक
2 सर्पदंश झालेल्या चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू
3 वधारलेल्या दराने मासळी ‘बेचव’
Just Now!
X