अल्पवयीन अनाथ मुलीचा आपल्या मुलाशी विवाह लावून देणाऱ्या महिलेसह मुलीचा काका व अन्य सहा जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. पांढरवकडा पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले.

पांढरकवडा तालुक्यातील मांगुर्डा पोड येथे १४ एप्रिलला अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची तक्रार ‘चाईल्ड लाईन १०९८ हेल्पलाईन’ क्रमांकावर आली. यवतमाळ येथील ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक अपर्णा गुजर यांनी ही माहिती तात्काळ जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास कळवली. येथील परिविक्षा अधिकारी गणेश ठाकरे यांनी मांगुर्डा गावातील ग्रामसेवक, पोलीस पाटील विशाल अनाके, अंगणवाडी सेविकाज्योती मेश्राम यांना विवाहस्थळी जाऊन हा विवाह रोखण्याच्या सूचना केल्या.

ही मंडळी विवाहस्थळी गेल्यानंतर वधू- वराकडील मंडळींनी या कर्मचाऱ्यांशी वाद घालून जे करायचं ते करा, हा विवाह करून दाखवू, अशी धमकी दिली आणि १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला. या घटनेची दखल घेऊन महिला व बालविकास अधिकारी अर्चना इंगोले यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात २७ एप्रिलला तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा बालविवाह झाल्याचे निदर्शनास आले.