यवतमाळ : वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या परंतु यवतमाळात मामांकडे वास्तव्यास असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण कक्षाला यश आले. या महिन्यातील हा अकरावा बालविवाह कक्षाने रोखला आहे. टाळेबंदीमुळे आर्थिक अडचणीत असलेले अनेक पालक योग्य वर शोधून अल्पवयीन मुलींचा विवाह लावून देण्याचे प्रकार वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

कळंब तालुक्यातील खैरी येथे मामांकडे वास्तव्याला असलेल्या व मूळच्या वर्धा जिल्ह्यातील सावंगी (पोड) येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह यवतमाळ शहरानजीकच्या गोधनी येथील व्यक्तीसोबत उद्या, २९ एप्रिलला होऊ घातला होता. याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वर्धा यांच्यामार्फत यवतमाळ येथील जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयास माहिती प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी खैरी गावातील पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या मदतीने मुलीच्या नातेवाईकांची भेट घेऊन मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिचा विवाह करण्याबाबत समुपदेशन केले.

नातेवाईकांनी मुलगी सज्ञान झाल्यानंतर विवाह करण्याबाबत लेखी जबाब दिला. त्यामुळे उद्या होणारा बालविवाह टळला. कारवाई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू व कळंबचे ठाणेदार अजित राठोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या कार्यवाहीत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, सामाजिक कार्यकर्ता आकाश र्बुेवार, अंगणवाडी सेविका जोत्स्ना राऊत, पोलीस पाटील ज्योती चव्हाण, आशा स्वयंसेविका वनिता वरझडकर, वसंत चव्हाण आदी सहभागी झाले होते.