शैक्षणिक दाखल्यावरील जात काढण्याचे बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य दुधखुळेपणाचे आहे. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. बाबासाहेबांनीही जातिअंतासाठी लढा दिला आहे. आधी जाती नष्ट करा, आम्ही आरक्षण सोडू, असे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
रिपाइंच्या वतीने येथे आयोजित स्वतंत्र विदर्भ राज्याच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आठवले आले होते. तत्पूर्वी, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संयुक्त महाराष्ट्रात विदर्भावर अन्याय झाला आहे. राज्य सरकार विदर्भाला न्याय देण्यासाठी असमर्थ ठरले आहे. तेलंगणासोबत स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे. स्वतंत्र विदर्भाबाबत शिवसेनेची भूमिका वेगळी आहे, मात्र त्यामुळे महायुतीत काही फरक पडणार नाही. विदर्भावर अन्याय झाला, हे शिवसेनेलाही मान्य आहे. लवकरच विदर्भातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविणार आहोत. त्यानंतर विदर्भमुक्तीचा लढा उभा केला जाईल. राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. १२५ तालुके दुष्काळग्रस्त आहेत. याबाबत राज्य शासन उदासीन असल्याची टीका आठवले यांनी केली.
भारिप-बमसंचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. शैक्षणिक दाखल्यावरून जाती काढण्याचे त्यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. दाखल्यावरून जात काढली तरी मनातली जात जाणार नाही. अ‍ॅड. आंबेडकरांची भूमिका दलितविरोधी आहे. कष्टाने मिळविलेले आरक्षण आम्ही सोडणार नाही. आधी जाती नष्ट करा, मगच आम्ही आरक्षण सोडू. देशाच्या विरोधात काम करणारे हिंदू असोत किंवा मुस्लीम, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे आठवले म्हणाले. पत्रपरिषदेला रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सचिव भूपेंद्र थूलकर, उपाध्यक्ष दयाल बहादूर, जिल्हा महासचिव सिद्धार्थ पाथाडे, जिल्हाध्यक्ष अशोक घोटेकर उपस्थित होते.