वृद्धापकाळामुळे पतीचा झालेला मृत्यू, त्याची माहिती परप्रांतात असलेल्या मुलामुलींना मिळते. परंतु करोना विषाणू रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे प्रयत्न करूनही मुलामुलींना पित्याच्या अंत्यविधीला हजर राहता आले नाही. ज्या मुलाच्या हातून पित्याच्या मृतदेहाला मुखाग्नी मिळावा, ती मुलेच येऊ  न शकल्यामुळे अखेर पत्नीनेच पतीला मुखाग्नी देण्याची घटना सोलापुरात घडली.

शहराच्या पूर्व भागात साईबाबा चौकात राहणारे व्यंकटय्या राजमल्लू बोद्दूल (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना तीन विवाहित मुले व एक मुलगी आहे. त्यापैकी बलराज व अनिल हे दोघे हैदराबाद येथे तर तिसरा मुलगा कृष्णा हा तेलंगणात सिद्धी पेठ येथे राहतो. तर मुलगी सुजाता ही करीमनगरात राहते. इकडे सोलापुरात मृत व्यंकटय्या व पत्नी शामलव्वा (वय ७०) हे दोघे वृद्ध दाम्पत्य राहत होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांनी उतरत्या वयात एकमेकांना साथ देत संसार चालविला होता. परंतु वृद्धापकाळाने व्यंकटय्या यांचा मृत्यू झाला. ही दु:खद वार्ता परप्रांतात मुलामुलींना समजली. मात्र देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारलेल्या टाळेबंदीमुळे प्रयत्न करूनही त्यांच्यापैकी कोणालाही सोलापुरात जन्मदात्या पित्याच्या अंत्यविधीला आणि मुखाग्नी द्यायला येता आले नाही. मृत व्यंकटय्या यांना भाऊ  व पुतणेही नाहीत. त्यामुळे अंत्यविधीचे कोणी करायचा हा प्रश्न उपस्थित झाला होता.

टाळेबंदी व संचारबंदीमुळे व्यंकटय्यांच्या अंत्यविधीसाठी जेमतेम स्वरूपात आलेल्या नातेवाइकांनी चर्चा करून अखेरचा पर्याय म्हणून पत्नी शामलव्वा यांच्या हातूनच पतीवरील अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत व्यंकटय्या यांचा मृतदेह चितेवर ठेवून पत्नीनेच मुखाग्नी दिला. करोना साथीमुळे सगळा देश बंद केला असल्याने आपल्या पित्याच्या अंत्यसंस्कारालाही मुलांना उपस्थित राहता न आल्याने या वेळी सारे जण अक्षरश: गहिवरले.

‘व्हिडिओ कॉलिंग’द्वारे अंत्यदर्शन

देशातील संचारबंदीसदृश स्थितीमुळे मृत व्यंकटय्या यांच्या तीन मुलांपैकी एकालाही अंत्यविधीसाठी येता आले नाही. अखेर या दुर्दैवी मुले, मुलगी, सुना व नातवंडांवर ‘व्हिडिओ कॉलिंग’द्वारे अंत्यविधी पाहण्याची वेळ आली. पित्याच्या अंत्यविधीचे सारे क्रियाकर्म धीरोदात्तपणे आईच करीत असल्याचे पाहून तिकडे मुलांच्या अश्रूंचा बांध केव्हाच फुटला होता.