दिगंबर शिंदे

सांगलीतील धक्कादायक घटना, वृद्धेला निराधार केंद्राचा आधार

‘मी, माझी बायको अन् माझी मुले’ अशी चौकोनी कुटुंब व्यवस्था असलेल्या या जगात जन्मदात्रीचेही ओझे वाटण्याची घटना सांगलीत उघडकीस आली. घर कुलूपबंद करून आईला घराबाहेर काढून परागंदा होण्याचा प्रताप घरच्यांनी केला. पाऊणशे वयोमान असलेली ही वृद्धा तीन दिवस थंडीत कुडकुडत होती. अखेर येथील ‘इन्साफ फाऊंडेशन’च्या ‘सावली’ निराधार केंद्राने या वृद्धेला मदतीचा हात दिल्याने तिला मायेची ऊब मिळाली आहे.

शांताबाई खोत (वय ७५) असे या वृद्ध निराधार महिलेचे नाव आहे. या बाबत समजलेली माहिती अशी, की संबंधित वृद्धेच्या पतीचे निधन झालेले आहे. तिला तीन मुलगे, चार मुली आहेत. तसेच तब्बल २० एकर जमीन तिच्या नावावर होती. मात्र पतीच्या निधनानंतर मुलांमध्ये या संपत्तीवरून वाद सुरू झाला. या वादातून प्रत्येकाने आपला हिस्सा मिळवला आणि तो विकूनही टाकला. दरम्यान, यानंतर आईचा सांभाळ कोणी करायचा यावरून सातत्याने वाद सुरू होते. यातूनच तीन दिवसांपूर्वी या मुलांनी आपल्या आईला काहीतरी थापा मारत शहरातील अनोळखी भागात आणून  बेवारसपणे सोडून दिले.

शहरातील अहिल्यानगरातील एका घरासमोर बेवारसपणे सोडून देत मुले परागंदा  झाली. आपली मुले आज येतील, उद्या येतील या आशेवर शांताबाई गेली तीन दिवस रस्त्यावर बसून होत्या. खायला अन्न नाही, राहायला छत नाही, ऐन थंडीत पांघरायला कपडे नाहीत. अशा अवस्थेत त्यांनी या कडाक्याच्या थंडीत तीन दिवस काढले.

दरम्यान, परिसरात राहणाऱ्यांना त्यांची ही हलाखी समजताच काहींनी त्यांची खाण्याची सोय केली. त्यांच्याकडून माहिती घेऊन काहींनी मुलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण या मुलांकडून काहीही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर वृद्धेकडून समजलेल्या पत्त्यावर एकदोघे जाऊन आले, पण भाडय़ाच्या असलेल्या या घरालाही कुलूप असल्याचे त्यांना दिसले. हे घर  सोडून कुटुंब निघून गेल्याचे सांगण्यात आले. अखेर त्यांची ही विवंचना शहरातील ‘इन्साफ फाऊंडेशन’च्या मुस्तफा मुजावर यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी संबंधित वृद्धेला त्यांच्या संस्थेतर्फे नुकत्याच सुरू केलेल्या ‘सावली’ निराधार केंद्रात दाखल केले. यामुळे या आजीला मायेची ऊब मिळाली आहे. मुस्तफा यांनी या बाबत त्यांची संपूर्ण माहिती घेत पोलिसांनाही कळवले आहे. तसेच नातलगांविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला आहे. पोलीस या तक्रारीच्या आधारे संबंधित वृद्धेच्या नातलगांचा शोध घेत आहेत.