अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या उपनगरीय सोलापूर शाखेने आयोजिलेल्या पहिल्या अ. भा. मराठी बालनाट्य संमेलनाचे उद्घाटन उद्या शनिवारी सकाळी दहा वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होत आहे.

बालनाटय़ क्षेत्रात उल्लेखनीय प्रयोग करणाऱ्या कांचन सोनटक्के यांना संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळाला असून शुक्रवारी सायंकाळी त्यांचे सोलापुरात आगमन झाले. त्यांच्या समवेत अ. भा. मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी व मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षा तथा ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज आदींचेही आगमन झाले. या सर्वाचे संमेलन संयोजन समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले.
उद्या शनिवारी सकाळी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास फैय्याज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तत्पूर्वी, तुळजापूर वेशीतील ऐतिहासिक बलिदान चौकातून हजारो बालगोपाळांचा सहभाग असलेली नाटय़िदडी काढण्यात येणार आहे. िदडी संमेलनस्थळी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मदानावर बाळासाहेब ठाकरे नाटय़नगरीत पोहोचल्यानंतर औपचारिक उद्घाटन सोहळा सुरू होईल. संमेलनाच्या स्वागताध्यक्षा आमदार प्रणिती िशदे व निमंत्रक तथा महापौर प्रा.सुशीला आबुटे यांच्यासह संयोजन समितीचे पदाधिकारी हे संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, गेले दोन दिवस हरिभाई देवकरण प्रशाला पटांगण व हुतात्मा स्मृतिमंदिरात स्थानिक बालकलावंतांनी विविध गुणदर्शन सादर केले. यात एकांकिकेसह नाटय़छटा, नकला, नृत्य आदींचा कलाविष्कार घडविण्यात आला.