पालकांना चिंता; मधुमेही मुलांची आकडेवारी प्रशासनाकडेही नाही

औरंगाबाद : शरीरात इन्शुलिन तयार होत नाही, अशा टाईप-१ प्रकारचा मधुमेह असलेल्या मुलांना म्युकोरमायकोसिसचा धोका असून त्यामुळे अशा मुलांचे पालक एक प्रकारे अस्वस्थ झाले आहेत. मधुमेही मुलांची संख्या ग्रामीण भागातही लक्षणीय असून त्याबाबतच्या सर्वेक्षणाची योजनाच नसल्याने प्रशासकीय यंत्रणेकडे आकडेवारीही उपलब्ध नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मधुमेह असलेल्या मुलांचा शोध घेणेही एकप्रकारचे प्रशासकीय यंत्रणेपुढे आव्हान आहे.

मधुमेहामध्ये टाईप-१ व टाईप-२ असे दोन प्रकार आढळतात. टाईप-२ प्रकारचा मधुमेह हा मोठ्यांमध्ये तर टाईप-१ हा लहान मुलांमध्ये आढळून येतो. मराठवाड्यात उडान संस्थेअंतर्गत नोंदणी झालेले ९०० टाईप-१ प्रकारचा मधुमेह असलेली मुले आहेत. ही संख्या दोन हजारांवरही असू शकते. तर भारतात दीड लाख मुले टाईप-१ मधील असल्याची नोंद आहे, असे मधुमेही मुलांसाठी काम करणाऱ्या औरंगाबादेतील उडान या संस्थेच्या संचालिका डॉ. अर्चना सारडा यांनी सांगितले.

करोनाकाळात मधुमेह असलेल्या मुलांची मानसिक शक्ती प्रबळ असणे गरजेचे आहे. मुले मोबाइल फोनवर खेळतात. अभ्यासासाठी मुलांवर पालकांकडून आग्रह धरला जातो. बऱ्याच वेळा मुले ऐकत नाहीत. करोना परिस्थितीमुळे बाहेरही त्यांना जाता येत नाही. अशावेळी चिडचिड होते. मुले त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना फोन करून पालकांबाबत नाराजीही व्यक्त करतात. तेव्हा मुलांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे, असे पालकांना समजून सांगावे लागत असल्याचे डॉ. सारडा यांनी सांगितले.

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असून बाधित होण्यापासून दूर राहण्यासाठी पालकांनी मधुमेही मुलांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कायम तपासावे. घरातल्या घरात मुलांना सूर्यनमस्कार, दोरीवरच्या उड्या मारून व्यायामही करण्यावर लक्ष केंद्रित करून काळजी घेतली जाऊ शकते.

उडानअंतर्गत नोंदणी झालेल्या ९०० पैकी २० मुलांना आतापर्यंत करोना झालेला आहे. मात्र, वेळीच उपचार घेतल्याने ते आता करोनामुक्त झालेले आहेत. मधुमेही मुलांनी किंवा त्यांच्या पालकांनी सर्दी, ताप अथवा अन्य कुठलीही लक्षणे आढळल्यास अंगावर आजार न काढता तातडीने डॉक्टरांशी संपर्क करून रुग्णालयात जाऊन उपचार घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सारडा सांगतात.

मधुमेह असलेल्या मुलांच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम अद्याप प्रशासनाच्या अजेंड्यावर नाही. त्या पार्श्वभूमीवर विचारले असता आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले की, मधुमेही मुलांच्या सर्वेक्षणाबाबत कुठलीही योजना ग्रामीण स्तरावर सध्या तरी राबवण्यात येत नाही. मात्र, मधुमेह असलेल्या मोठ्या व्यक्तीबाबत माहिती घेतली जाते. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी प्रसाद मिरकले यांनीही कार्यालयाच्या कक्षेत मधुमेह असलेल्या लहान मुलांबाबत माहिती घेण्याचे काम सूचवण्यात आलेले नाही, असे  सांगितले.

मुलांपेक्षा मोठ्यांची चिंता

टाईप-१ मधुमेह असलेल्या मुलांमध्ये अद्याप तरी म्युकोरमायकोसिसची लक्षणे आढळून आलेली नाहीत. मात्र, त्यांना धोका आहे. उडानअंतर्गत २० मधुमेही मुलांना करोना होऊन गेलेला आहे. आता ते ठणठणीत आहेत. मोठ्यांमधील टाईप-२ प्रकारातील मुधमेही रुग्णांना इतरही अनेक व्याधी असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांना चिंता वाटते. मुलांबाबत वेळीच काळजी घेतली तर करोनाच्या आजारातून पूर्णपणे मुक्त होता येते. मधुमेह असलेल्या लहान मुलांचा शोध घेऊन त्यांची आकडेवारी प्रशासनाकडे असावी, असा प्रस्ताव आरोग्यमंत्री, अधिकाऱ्यांपुढे ठेवलेला आहे. गतवर्षीपासून करोनामुळे काम थांबले आहे. – डॉ. अर्चना सारडा, बालमधुमेह तज्ज्ञ.