आजच्या मुलांना बालनाटय़ासारख्या नाटकाच्या प्रयोगात सामील करून घेऊन सांस्कृतिक ठेवा जोपासला जात आहे, ही आनंदाची बाब आहे. फुलपाखरू एक कीटक आहे या बालनाटय़ासारखेच उषा परब यांनी सिनेमा निर्माण करता येईल अशा पुस्तकाचे लिखाण केले तर नक्कीच सिनेमानिर्मितीचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास माजी आमदार शिवराम दळवी यांनी व्यक्त केला.
अटल प्रतिष्ठान निर्मित व उषा परब लिखित, दिग्दर्शित बालनाटय़ ‘फुलपाखरू एक कीटक आहे’च्या शुभारंभ प्रसंगी माजी आमदार शिवराम दळवी बोलत होते. या वेळी लेखिका उषा परब, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पार्सेकर, अ‍ॅड. बापू गव्हाणकर, डॉ. जी. ए. बुवा, कॉनबॅकचे संचालक मोहन होडावडेकर, प्रसाद महाले, अनुराधा परब, तृप्ती पार्सेकर, प्रवीण परब, बीचकर आदी उपस्थित होते.
मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचे अटल प्रतिष्ठान काम करीत आहे त्याचे कौतुक करून शिवराम दळवी म्हणाले, उषा परब यांनी आतापर्यंत तीन पुस्तकांचे लिखाण केले आहे. आता त्यांनी सिनेमा काढता येईल अशा पुस्तकाचे लिखाण करावे. माझा मुलगा सिनेमानिर्मिती करतो आहे. मराठी सिनेमात भवितव्य आहे. सिनेमानिर्मिती करण्यासारख्या पुस्तकाचे लिखाण झाल्यास तसा विचार केला जाईल. या वेळी अ‍ॅड. बापू गव्हाणकर व डॉ. जी. ए. बुवा यांनी शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक क्षेत्राची आवड व निवड करण्यासाठी असे प्रयत्न व्हायला हवेत, असे स्पष्ट केले. या वेळी उषा परब यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय बाल कलाकार लक्ष्मण ठाकूर व चिन्मयी दळवी यांना शिवराम दळवी यांनी रोख पारितोषिक देऊन त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. नकुल पार्सेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजेश नवांगुळ यांच्या हस्ते डॉ. सोनल लेले व डॉ. संगीता जूपकर या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.