अनिकेत साठे, नाशिक

नियमित हंगामातील द्राक्षे निर्यातीला सुरुवात झाली असून प्रारंभीच दर गतवर्षीच्या तुलनेत १५ ते २० टक्क्य़ांनी घसरले आहेत. सध्या निर्यातक्षम द्राक्षांना प्रति किलोस ६० ते ८० रुपये दर मिळत आहे. युरोपीय राष्ट्रांमध्ये चिली, दक्षिण आफ्रिकेतून मुबलक द्राक्षे येत आहेत. त्याचा फटका भारतीय द्राक्षांना बसला आहे. थंडीची लाट कायम राहिल्याने देशांतर्गत बाजारातही फारसा उठाव नाही. मुबलक उत्पादनामुळे खवय्यांना यंदा स्वस्तात द्राक्षे चाखण्यास मिळतील, असे सध्याचे चित्र आहे.

आपल्या चवीने देशासह परदेशातील नागरिकांना भुरळ पाडणारी नाशिकची द्राक्षे महिनाभर कडाक्याच्या थंडीत सापडली. ही स्थिती अद्याप बदललेली नाही. जिल्ह्य़ात दोन लाख एकर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. सलग तीन आठवडे तापमान पाच ते १० अंशादरम्यान राहिले. द्राक्षवेली सुप्तावस्थेत जाऊन विकास थांबला. द्राक्षमण्यांत साखर उतरणे, फुगवण होणे हे थंडावले. काही भागात मण्यांना तडे गेले. या सर्वाची परिणती द्राक्षबागा तयार होण्याचा कालावधी लांबण्यात झाली. थंडीच्या तडाख्यात बागा वाचविण्यासाठी उत्पादकांना धडपड करावी लागली. अनेक बागा तयार असल्या तरी द्राक्षमण्यांत साखर उतरलेली नाही. यामुळे काढणी करता येत नसल्याचे उत्पादक सांगतात. दरवर्षी जानेवारीच्या प्रारंभीच निर्यातीला वेग येतो. यावेळी थंडीचा मुक्काम आणि जागतिक बाजारातील स्थितीचे द्राक्षे निर्यातीवर सावट आहे. भारतीय द्राक्षे युरोपीय राष्ट्रांसह रशिया, आखाती देश, बांग्लादेश आणि नव्याने ऑस्ट्रेलियात निर्यात होतात. पोषक हवामानामुळे यंदा निर्यातीचा आलेख उंचावण्यास अनुकूल स्थिती होती. त्यात प्रथम थंडीने अवरोध आणले. आता बाजारभाव कळीचा मुद्दा ठरला आहे.

हंगामपूर्व निर्यातक्षम द्राक्षांना (अर्ली) ९० ते १०० रुपये दर मिळाले होते. पण, नियमित हंगामातील द्राक्षे निर्यात सुरू झाल्यानंतर ते खाली उतरले. युरोपीय राष्ट्रांमध्ये सध्या चिली, दक्षिण आफ्रिकेतील द्राक्षांचा वरचष्मा आहे. भारतीय आणि त्या राष्ट्रांतील द्राक्षे वाणात बराच फरक आहे. स्थानिक पातळीवर थॉमसन, सोनाका, माणिकचमन, शरद सिडलेस, जम्बो सिडलेस, ताज गणेश, नाना पर्लल आदी वाणांची द्राक्ष उत्पादित होतात. निर्यातक्षम द्राक्षांसाठी मण्यांचा आकार महत्त्वाचा असतो. त्याकरिता ‘हार्मोन्स’ द्यावी लागतात. चिली, इस्त्रायलची द्राक्षे हार्मोन्स विरहित, आकाराने मोठी आणि आकर्षक रंगात असल्याने भारतीय द्राक्षांना स्पर्धा करणे अवघड ठरते, याकडे जाणकार लक्ष वेधत आहेत. बांग्लादेशमध्ये द्राक्षांना चांगले दर मिळतात. कारण, त्यांना भारताशिवाय कोणी पुरवठादार नाही. देशांतर्गत बाजारात मागणी वाढलेली नाही. कारण, बहुतांश भागात महिनाभरापासून शीतलहर आहे. त्याचा परिणाम दरावर होत आहे. गेल्या वर्षी उत्पादन कमी होते. यंदा ते चांगलेच वाढणार आहे. पुढील काही दिवसांत बहुतांश भागातून काढणीला सुरुवात होईल. द्राक्षांची आवक वाढेल. तेव्हा भाव आणखी खाली येतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

इतर देशांमधून युरोपीय राष्ट्रांमध्ये मोठय़ा प्रमाणात द्राक्षे येत आहेत. त्यांच्याशी स्पर्धा करावी लागत असल्याने भारतीय द्राक्षांचे दर काहीअंशी कमी झाले. गतवर्षी द्राक्षांचे उत्पादन कमी होते. यंदा ते लक्षणीय वाढणार आहे. निर्यातीला २० जानेवारीनंतर वेग येईल. मागणी आणि पुरवठा यांचा विचार केल्यास हंगामात दर काहीअंशी असेच राहतील.

-विलास शिंदे (निर्यातदार, सह्य़ाद्री अ‍ॅग्रो)

महिनाभर कडाक्याच्या थंडीमुळे बहुतांश द्राक्षबागांच्या विकासावर विपरीत परिणाम झाला. अपेक्षित साखर उतरली नाही. यामुळे काढणी लांबणीवर पडली आहे. ज्या बागांमधून काढणी सुरू झाली, त्या द्राक्षांना कमी दर मिळत आहे. देशात थंडीची लाट असल्याने मालास उठाव नाही. निर्यातीने जोर पकडलेला नाही.

– रवींद्र बोराडे (विभागीय अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ)