गतवर्षी आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना मिरचीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे उभे पीक जाळून देण्याची वेळ आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिरची लागवडीकडे पाठ फिरविली. उत्पादनात घट झाल्यामुळे या वर्षी मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे मिरचीचा भाव भडकला आहे. १५० ते २०० रुपये प्रतिक्विंटलवर मिरचीचे भाव पोहोचले असल्यामुळे या वर्षी मिरचीचा ठसका सामान्य ग्राहकास चांगलाच त्रास देतो आहे.

गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे लाल मिरचीचे विक्रमी उत्पादन झाले होते. केंद्र सरकारने नोटबंदी लागू केल्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठी खरेदी कमी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मातीमोल दराने मिरची विकावी लागली. उत्पादनखर्चही न निघाल्यामुळे उभे पीक जाळून टाकण्याची वेळ आंध्र व कर्नाटकातील शेतकऱ्यांवर आली. परिणामी. या वर्षी मिरचीच्या लागवडीत ५० टक्केपेक्षा अधिक घट झाली. शीतगृहात ३ हजार टन मिरचीचा साठा उपलब्ध होता, त्यापकी डिसेंबरअखेर २ हजार टन निर्यात झाला व १ हजार टन देशांतर्गत विकला गेला. त्यामुळे नवीन येणारे पीक कमी आणि वार्षकि खरेदी व लग्नसराईची मागणी अधिक परिणामी सरासरीपेक्षा ३० टक्के मिरचीच्या भावात वाढ झाली आहे.

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी, नेत्रविकारासाठी व शरीरातील कर्ब कमी करण्यासाठी लाल मिरचीचा लाभ होत असल्याचे आयुर्वेद सांगते. जगभर लाल मिरचीचे उत्पादन होते. प्रत्येक देशातील मिरचीची चव वेगळी आहे. सर्वाधिक उत्पादन भारतात होते. जगात सर्वाधिक मिरची निर्यात करणारा देश म्हणून भारत ओळखला जातो. आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र या प्रांतात प्रामुख्याने मिरचीची लागवड केली जाते. सर्वाधिक उत्तम प्रतीची मिरची आंध्र प्रदेशातील गुंटुर परिसरात उत्पादित केली जाते. तेलंगणा विभागात उत्पादित होणारी मिरचीच ‘तेजा’ नावाने ओळखले जाते, तर कर्नाटक प्रांतात उत्पादित होणारी मिरचीच बॅडगी नावाने ओळखली जाते.

मिरची तिखट असली तरी तिचा रंगही लाल हवा, त्यामुळे गुंटुर, तेजा व बॅडगी या मिरचीलाच घरोघरी अधिक मागणी असते. दरवर्षी फेब्रुवारी ते जून महिन्यापर्यंत मिरचीची वार्षकि खरेदी केली जाते. लग्नसराईमुळे मागणीत वाढ होते. सर्वसाधारण कुटुंबात मिरच्या विकत घेऊन, त्याची देठे काढून घरचे तिखट वापरण्याकडे कल असतो. हॉटेल व्यावसायिक व नोकरी करणाऱ्या महिला मात्र तयार तिखट वापरतात. गतवर्षीची नोटबंदी व या वर्षी जीएसटी लागू झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू ठेवले आहेत.

वस्तू व सेवाकरामुळे व्यापारी नाराज

मिरचीला जीएसटी लावल्यामुळे मिरची व्यापाऱ्यात नाराजी आहे. मिरची उत्पादक त्यामुळे हिरवी मिरचीचे उत्पादन घेऊन बाजारात विकण्याकडे भर देतो आहे. अन्नधान्याला जीएसटी लावणे चुकीचे असल्याचे मत अनेक जण व्यक्त करतात. गतवर्षीच्या अधिक उत्पादनाचा फटका या वर्षी बाजारपेठेला सहन करावा लागत असून डिलक्स बॅडगी मिरचीचे भाव २२० ते ३०० रुपये किलो, डिलक्स गुंटुरचे १२० ते १५० व डिलक्स तेजाचे १२० ते १५० पर्यंत आहेत. या वाढीला सरकारचे धोरण कारणीभूत ठरते आहे. त्यामुळे बाजारपेठेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. प्रदीप स्वामी, कार्याध्यक्ष, लाल मिरची व्यापारी संघटना.