|| प्रशांत देशमुख

शरद पवार यांच्या सूचनेवर प्रश्नचिन्ह :- फळशेतीचा मला नादच, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी विदर्भ दौऱ्यात नागपुरी संत्री उत्पादकांच्या भरभराटीसाठी थेट चीनला फोन लावला होता. मात्र चीनच्या आयातक्षम फळांच्या यादीत भारतीय संत्री नसल्याने त्यांच्या फोनवरील सूचनेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

यातून मार्ग काढण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून चीनमध्ये भारतीय संत्री विकण्याचा निर्धार महाऑरेंजने व्यक्त केला आहे.

अवकाळी पावसाने विदर्भातील शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी पवार हे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले होते. काटोल भागात संत्रा बागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या परिसरातील संत्रा उत्पादकांनी सध्याच्या हानीसोबतच अन्य अडचणी मांडल्यावर पवारांनी दुसऱ्या दिवशी केवळ संत्र्यावरच चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. संत्रा उत्पादकांना योग्य मोबदला मिळण्यासाठी संत्र्यांची मोठय़ा प्रमाणात निर्यात करण्याची सूचना त्यांनी केली. यासाठी पवारांनी चीन येथील भारतीय दूतावासाशी लगेच संपर्क साधला व तेथील वाणिज्य दूतावासात कार्यरत अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्याशी चर्चा करीत मार्ग काढण्याची सूचना केली, अशी माहिती या बैठकीला उपस्थित महाऑरेंजचे संचालक श्रीधर ठाकरे यांनी दिली.

यानंतर लोखंडे यांनी श्रीधर ठाकरे यांच्याशी संपर्क करीत फळ आयातीच्या चीनच्या प्राधान्य यादीतील समस्या सांगितली. भारतातून केवळ डाळिंब व द्राक्षच चीनला आयात होतात. प्राधान्य यादीत नसलेल्या फळांना आयातीची परवानगी नसते. चीनमध्ये संत्र्यांना मोठी मागणी असून ४ हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे. प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडची संत्री चीनमध्ये येतात. याबाबत श्रीधर ठाकरे म्हणाले, चीनच्या यादीत भारतीय संत्री नसल्याची बाब प्रथमच उघड झाली. श्रीलंका, बांगलादेश, दुबई या ठिकाणी नागपुरी संत्री निर्यात होतात. चीनची बाजारपेठ माहीतच नव्हती. मात्र आता चीनला संत्री पाठवण्याचा विचार पक्का झाला आहे. आंबिया बहार अकाली पावसाने गेला. मात्र जानेवारी ते एप्रिलपर्यंत राहणाऱ्या मृग बहारातील संत्री निर्यात होऊ शकतात. या काळातील संत्रीच चविष्ट असल्याने निर्यातक्षम समजले जातात. त्यासाठी अपेक्षित सोपस्कार दीड-दोन महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे