19 October 2020

News Flash

चिपळूण तालुक्यात दीडशे शेतकऱ्यांना विंचूदंश 

४७ जणांना सर्पदंश झाला आहे. 

(संग्रहित छायाचित्र)

दीर्घ काळ लांबलेल्या पावसाने अखेर विश्रांती घेतल्यामुळे सुटकेचा निश्वास टाकलेल्या शेतकऱ्यांना आता भात कापणी करताना  विंचू आणि सर्पदंशाला सामोरे जावे लागत असून यावर्षीच्या हंगामात आत्तापर्यंत चिपळूण तालुक्यातील सुमारे दीडशेजणांना विंचूदंश, तर ४७ जणांना सर्पदंश झाला आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली. तालुक्यात सुमारे साडेसहा हजार मिलीमीटरचा टप्पा यावर्षी पावसाने ओलांडला आहे. त्यातच परतीचा पाऊस, वादळ आणि अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतीची दैना उडाली आहे. अनेक गावातील पानथळ असलेली जागेतील भातशेती कुजली. काही ठिकाणी भातपीक कोलमडून मोठे नुकसानही झाले. त्यामुळे वातावरणातील बदलामुळे वाचलेले भातपीक कापण्याची मोहीम सध्या सुरू आहे. अवकाळी पाऊस अजूनही सुरूच असल्याने पावसाचे वातावरण पाहून शेतकऱ्यांची कापणीची धावपळ सुरू आहे.

तालुक्यातील कामथे येथील रूग्णालयात झालेल्या उपचारांच्या नोंदींनुसार गेल्या महिन्यात एकूण १३१, तर चालू महिन्याच्या  केवळ तीन दिवसात २३ शेतकऱ्यांना विंचूदंश झाला आहे. तसेच सर्पदंशाचे प्रमाणही वाढले असून गेल्या महिन्यात ३९, तर चालू महिन्यात आत्तापर्यंत  ८ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद या रूग्णालयात झाली आहे.

पावसामुळे भिजलेल्या भाताच्या पेंढय़ा सुकवण्यासाठी  पसरवून ठेवल्या जात आहेत.  या पेंढयांखाली उबेसाठी विंचू आश्रय घेतात. शेतात कापणी आणि त्यानंतर झोडणीचे काम करणाऱ्या  शेतकऱ्यांना अशा विंचुंनी दंश करण्याचे प्रकार दरवर्षी घडतात.पण यंदा पावसामुळे पेंढय़ा दीर्घ काळ पसरून ठेवल्या गेल्या आणि त्या खाली आश्रयाला येणाऱ्या विंचुंची संख्याही बहुधा वाढली असावी. त्यामुळे विंचूदंशाच्या प्रमाणात वाढ  झाल्याचे दिसून येत आहे .

रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष हंकारे, डॉ. अक्षय रासवे, डॉ. आरिफ नरवडे, डॉ. मयूर बालतुरे इत्यादींकडून विंचू व सर्पदंश झालेल्यांना वेळेत उपचार मिळाल्याने गंभीर दुर्घटना टळली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 12:40 am

Web Title: chiplun scorpion bites to 150 farmers abn 97
Next Stories
1 डिसेंबरच्या अखेरीस नवा प्रदेशाध्यक्ष ; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
2 maharashtraneedsdevendra हॅशटॅगचं शिवसेनेकडून Fact check
3 शिवसेनेला पाठिंबा देणार का? अशोक चव्हाणांनी सांगितली काँग्रेसच्या ‘मन की बात’
Just Now!
X