भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चनांसंदर्भात केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील पक्षनेतृत्वाने झापल्याने गोपाळ शेट्टी नाराज असून त्यांनी राजीनामा देण्याचा इशाराच दिला आहे.  गोपाळ शेट्टींचा हा वाद नेमका काय, हे जाणून घेऊयात….

काय म्हटलंय गोपाळ शेट्टींनी? 

रविवारी मालाडमधील मालवणी परिसरात ईद- ए- मिलादचे आयोजन करण्यात आले होते. यात गोपाळ शेट्टीही सहभागी झाले होते. भाषणादरम्यान शेट्टी म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी हे देशातील  ख्रिश्चन हे ब्रिटिशच होते. त्यामुळे त्या समाजाने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला नाही. भारताला हिंदू किंवा मुस्लिमांनी नव्हे तर सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला म्हणून स्वातंत्र्य मिळाले, असे त्यांनी सांगितले. ‘सबका साथ, सबका विकास’ हा मोदींचा नारा असून हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे शेट्टी यांनी सांगितले.

भाजपाने फटकारले
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शेट्टी यांच्या विधानाशी असहमती दर्शवली. ‘शेट्टी यांना असे म्हणायचे नव्हते. मात्र, तरी देखील भाजपा अशा विधानांशी सहमत नाही. आम्ही ख्रिश्चन समाजाचाही आदर करतो, असे शेलार यांनी सांगितले.

वाचा सविस्तर: ख्रिश्चनांसंदर्भातील विधानानंतर गोपाळ शेट्टी देणार राजीनामा?

विधानाचा विपर्यास
गुरुवारी वाद निर्माण झाल्यानंतर शेट्टी यांनी प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्टीकरण दिले होते. ‘माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून माझ्यासाठी प्रत्येक भारतीय अग्रस्थानी आहे. मी देखील ‘सबका साथ, सबका विधान’ या विचारांचे अनुकरण करतो, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, शुक्रवारी त्यांनी यू- टर्न घेतला आणि मी विधानावर ठाम असल्याचे सांगितले.